गळा चिरला तरी संघ कार्यालयात जाणार नाही : राहुल गांधी | पुढारी

गळा चिरला तरी संघ कार्यालयात जाणार नाही : राहुल गांधी

नवी दिल्ली : माझी आणि वरुण गांधी यांची विचारधारा वेगळी आहे. माझा गळा चिरला तरी मी कधीच संघ कार्यालयात जाऊ शकत नसल्याचा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी केला. ते म्हणाले, वरुण गांधी भाजपमध्ये आहेत. ते जर भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यास त्यांना अडचणींना सामोरे जावे लागेल.

माझ्या कुटुंबाची एक विचारधारा आहे. मी वरुण गांधी यांना भेटू शकतो, त्यांना आलिंगन देऊ शकतो; मात्र त्यांची विचारधारा मी कधीच अंगिकारू शकत नाही. भगवान राम यांनाही रावणाबद्दल करुणा वाटली होती. त्यामुळे मला माहीत नाही की मोहन भागवत यांना कल्पना कुठून मिळत आहेत. या नक्कीच हिंदू संकल्पना नाहीत. त्या संघाच्या संकल्पना असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

पंजाबमध्ये सुरक्षेत दोनदा त्रुटी

पंजाबमध्ये काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू असताना राहुल गांधी यांच्या दोनवेळा त्रुटी झाल्याचे समोर आले आहे. होशियारपूरमध्ये आधी एक तरुण धावत आला आणि त्याने राहुल गांधी यांना जबरदस्तीने मिठी मारली. यानंतर एक संशयितही त्यांच्या एकदम जवळ पोहोचला होता. तरुणाने मिठी मारली त्यावेळी राहुल यांना पंजाब काँग्रेसचे प्रमुख राजा वार्डिंग यांच्या मदतीने त्या तरुणाला दूर ढकलले. यानंतर बस्सी गावात चहापानासाठी थांबले असताना डोक्याला भगवा कपडा बांधून एक तरुण राहुल यांच्या जवळ आला. हे पाहून सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्याला पकडले.

या दोन्ही घटना अवघ्या 35 मिनिटांत घडल्या. पंजाबमध्ये यात्रेदरम्यान राहुल यांना कडक सुरक्षा व्यवस्था देण्यात आली असताना सुरक्षेत त्रुटी झाल्याचे समोर आले आहे. राहुल यांनी थ्री लेयर सिक्युरिटी देण्यात आली होती. आधी पंजाब पोलिसांचे सुरक्षा कडे, त्यानंतर पंजाब पोलिस आणि राज्य सीआयडीचे कडे आणि शेवटी राहुल यांची सुरक्षा व्यवस्था आहे. दौर्‍याच्या पहिल्या 15 दिवसांत अशी कोणतीच चूक झाली नव्हती.

Back to top button