पिचकारी बहाद्दरांना दंडासह स्वच्छतेची शिक्षा; पालिकेकडून 123 जणांवर कारवाई | पुढारी

पिचकारी बहाद्दरांना दंडासह स्वच्छतेची शिक्षा; पालिकेकडून 123 जणांवर कारवाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रस्ते आणि पदपथांवर थुंकणार्‍यांविरोधात महापालिका प्रशासनाने कडक कारवाई हाती घेतली असून, तीन दिवसांत 123 पिचकारी बहाद्दरांवर कारवाई करण्यात आली आहे. पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनी या पिचकारी बहाद्दरांकडून 1 लाख 23 हजार दंड वसूल करण्यासोबतच थुंकलेल्या जागेची सफाई करून घेतली. जी 20 परिषदेच्या बैठका होणार असल्याने जगातील 36 देशांतील 120 प्रतिनिधी शहरात येणार आहेत.

या प्रतिनिधींच्या बैठका सेनापती बापट रस्त्यावरील जे. डब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये होणार आहेत. तसेच हे परदेशी पाहुणे शहरातील इतर ठिकाणांनाही भेट देणार आहेत. त्यामुळे महापालिकेसह जिल्हा प्रशासनाकडून विविध कामे केली जात आहेत. परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी शहर आकर्षक दिसावेत यासाठी महापालिकेच्या वतीने रस्ते दुभाजक, पदपथांसोबतच सार्वजनिक भिंतींची रंगरंगोटी करण्यात येत आहे. मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या या कामांवर तंबाखू, गुटखा खाऊन पिचकार्‍या मारून पुन्हा ते विद्रूप करत आहेत.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने सदस्य येण्याच्या आदल्या रात्री रस्ते, भिंती व रस्ते दुभाजक धुण्याचा निर्णय घेतला असून, पिचकारीबहाद्दरांवर वचक बसविण्यासाठी दंडात्मक करावाई सुरू केली आहे. आरोग्य निरीक्षकांच्या गस्ती पथकांनी पहिल्या दिवशी 23, दुसर्‍या दिवशी 29 तर तिसर्‍या दिवशी गुरुवारी 71 पिचकारी बहाद्दरांवर कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी 1 हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी दंडासोबत थुंकणार्‍यांकडून ज्या ठिकाणी थुंकला आहे ती जागा स्वच्छही करून घेण्यात आल्याचे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी सांगितले.

Back to top button