नगर : रस्त्याचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद | पुढारी

नगर : रस्त्याचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद

 ढोरजळगाव : पुढारी वृत्तसेवा :  शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ते गरडवाडी रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, गरडवाडीच्या संतप्त नागरिकांनी रस्त्याचे काम बंद पाडले. यावेळी नागरिकांनी रस्त्यातच ठिया आंदोलन केले.
जिल्हा नियोजनअंतर्गत 42 लाख रुपये खर्चाच्या 1335 मीटर लांबिच्या ढोरजळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ते गरडवाडी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम हॅबिटस बिल्डवेल या ठेकेदार कंपनीकडून सुरू आहे. त्यांनी यासाठी सब ठेकेदार नेमला असून, सुरुवातीला केलेले खडीकरण व मुरमिकरण करताना कामाचा दर्जा न राखल्याने अगोदरच रस्ता खचून त्यावर खाच-खळगे तयार झाले आहेत. त्याच कामावर विरळ खडी सुमारे महिनाभर अंथरूण ठेवली होती. त्यावरून प्रवाशांना जाताना तारेवरची कसरत करावी लागली.

अनेक ग्रामस्थ, महिला गाडी घसरून पडल्याने जखमीही झाल्या. मोटारसायकलचेही नुकसान झाले.शाळेचे विद्यार्थी, मुली अनेक दिवस चालुही शकले नाहीत. त्यानंतर संबधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम करत विरळ खडी अंथरूण त्यावर भरपूर पाणी न मारता वर-वर पाणी शिंपडले. रोलर व्यवस्थित न फिरवता त्यावर नियम डावलून रात्रीतून अंधारामध्ये डांबराचा थर टाकण्यात आला. यामध्ये डांबराचा अत्यंत कमी वापर केल्याने व दुसर्‍या दिवशी या रस्त्यावरून वाहने गेल्याने रस्त्यावर खड्डे पडले. तसेच काही खडी उखडली आहे. ठेकेदाराला ग्रामस्थांनी कल्पना देऊनही कामात सुधारणा न करता काम सुरूच ठेवले.

त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी काम बंद पाडून शेवगाव पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना याची कल्पना दिली. कनिष्ठ अभियंता सरोदे यांनी कामाची पाहणी केली असता ग्रामस्थांनी हाताने रस्ता उकरून झालेल्या निकृष्ट कामाचा नमुना त्यांना दाखविला. संबंधित ठेकेदारावर कारवाई न करता येथून काढता पाय घेतल्याने ग्रामस्थांनी अधिकार्‍यांवर रोष व्यक्त केला. टक्केवारीमुळे ठेकेदारांवर कुणाचा वचक न राहिल्याने ठेकेदार मनमानी करत असल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात जात आहेत.

त्यामुळे संबंधितांवर कारवाई करून गुणवत्तापूर्वक काम न झाल्यास रस्त्याचे काम होऊ देणार नसल्याचा इशारा संजय केदार, योगेश गरड, विठ्ठल गरड, माजी सरपंच पांडुरंग गरड, जालिंदर गरड, पांडुरंग सांगळे, बंडू गरड, विकास गरड, विष्णू सांगळे, हरिभाऊ देशमुख, बाबासाहेब पंडित, त्रिंबक केदार, सतीश केदार, प्रवीण गरड आदींनी दिला आहे.

Back to top button