महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे ‘वर्क फॉर्म जेल’ होते; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची टीका | पुढारी

महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे 'वर्क फॉर्म जेल' होते; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची टीका

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीच्या काळात मंत्र्यांपासून अधिकारी जेलमध्ये जाताना पाहिले. वर्क फ्रॉम वर्क बघितले होते. परंतु, मागील सरकारमध्ये आपल्याला ‘वर्कफॉर्म जेल’ बघायला मिळाले, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अमरावती पदवीधर मतदार संघातून भाजपने डॉ. रणजीत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज बुधवारी (दि.११) भरण्यात आला. यावेळी संवाद सभेत फडणवीस बोलत होते.

महाराष्ट्रात आपले सरकार आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत्तृत्वात भाजप आणि इतर मित्र पक्षांचे सरकार आले. सहा महिन्यामंध्ये सरकार काय असते? हे लोकांना कळायला लागले आहे. मागील अडीच वर्ष सरकार बंधिस्त होते. ते दाराआड होते. फेसबुक लाईव्ह वर सरकार चालवण्यात येत होते. मागच्या सरकारमध्ये फक्त वसुली होताना दिसायची, असे फडणवीस म्हणाले. मंत्री जेलमध्ये गेल्यावर मुख्यमंत्र्यांमध्ये एवढी हिंमत नव्हती की, जेलमध्ये गेलेल्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा. शेवटी आम्हालाच नवे सरकार स्थापन करून ते मंत्रीच हटवावे लागले.

जनादेशाचा अनादर करून आपल्या पाठीत खंजीर खुपसून हे अनैतिक सरकार आले होते. एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानेल की हिंदुत्वासाठी, बाळासाहेबांच्या विचाऱ्यांसाठी त्यांनी हा मोठा उठाव केला, असे फडणवीस म्हणाले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार चैनसुख संचेती, आमदार रामदास आंबटकर, संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

Back to top button