भगवानगड राजकारणमुक्त झाला की, पंकजा मुंडेमुक्त? मुंडे प्रेमींचा थेट सवाल | पुढारी

भगवानगड राजकारणमुक्त झाला की, पंकजा मुंडेमुक्त? मुंडे प्रेमींचा थेट सवाल

बीड, पुढारी वृत्तसेवा : एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरूवारी (दि.12) भगवान गडाचे महंत नामदेवशस्त्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका व्यासपीठावर येणार आहेत. या कार्यक्रमाची पत्रिका व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियात चर्चेला उधान आले आहे. महंत नामेदव शास्त्री यांनी भगवानगड राजकारण मुक्त करायचा म्हणत २०१७ मध्ये पंकजा मुंडे यांना गडावरून पायउतार केले. परंतु, अलीकडच्या काळात राजकीय नेत्यांची भगवान गडावर मांदीयाळी असून महंतांनी भगवानगड राजकारण मुक्त केला की, पंकजा मुंडेमुक्त केला? असा थेट सवाल मुंडेप्रेमी सोशल मीडियाच्या माध्यामातून विचारत आहेत. यामुळे चर्चेला उधान आले आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भगवान गडाचे मठाधीपती भीमसिंह महाराज असताना भगवान गडावर दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली. दरम्यान, संत भगवानबाबांचे दर्शन आणि  गोपीनाथ मुंडे यांचे विचार ऐकण्यासाठी दसरा मेळाव्याला लाखो लोकांची गर्दी जमू लागली. वंचित-उपेक्षीत समाजातील ऊसतोड कामगार, शेतकरी, भाविक यांच्या होणार्‍या गर्दीमुळे भगवान गडावरील लोकनेते मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला भक्ती आणि शक्तीचे स्वरूप प्राप्त झाले. सन २००८ च्या दसरा मेळाव्यात मुंडे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना ‘मला भगवान गडावरून दिल्ली दिसते’ असे वक्तव्य केले. यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी म्हणजेच सन २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथराव मुंडे हे लोकसभेची निवडणुक जिंकून दिल्लीला गेले.

प्रत्येक दसरा मेळाव्याला मुंडे भगवान गडावरून महत्वाचे विधान करायचे अन् त्याची राज्यभर चर्चा व्हायची. सन २०१४ मध्ये मुंडे यांनी सलग दसर्‍यांदा विक्रमी मतांनी लोकसभेची निवडणुक जिंकली. यावेळी केंद्रात भाजपची सत्ता आली. मुंडे यांनी २६ मे २०१४ मध्ये केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधीनंतर अवघ्या चार दिवसांनी म्हणजेच ३० मे २०१४ रोजी ते भगवान गडावर हेलीकॉप्टरने आले. यावेळी त्यांच्या सोबत तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस होते. यावेळी एका पत्रकाराने मुंडे साहेब, काही महिन्यांपुर्वी तुम्ही गडावरून मला पुन्हा दिल्ली दिसतेय असे म्हणाला होतात. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर आता तुम्हाला भगवान गडावरून काय दिसते?’ असा प्रश्‍न केला. यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी ‘मला भगवान गडावरून पंकजा दिसते’ असे उत्तर दिले. यानंतर मुंडे चौंडी येथील कार्यक्रमाला रवाना झाले.

दरम्यान यानंतर अवघ्या तीन- चार दिवसांनी दिल्लीत गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले. या दु:खद घटनेनंतर भगवानगडावर जेंव्हा स्व. मुंडे यांचा अस्थिकलश आला, त्यावेळी झालेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीने अनेकांच्या ऊरात धडकी भरली. यानंतर पडद्यामागे अनेक घटना घडल्या अन् पंकजा मुंडे यांच्या लोकप्रियतेची, त्यांच्या सभा आणि कार्यक्रमांना जमणार्‍या जनसागराची विरोधकच नव्हे, तर स्वकीयांना देखील भिती वाटू लागली. यातून अनेक पातळ्यावर षडयंत्र रचले गेले. सन २०१७ मध्ये भगवान गड राजकारण मुक्त करायचा म्हणत महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगडावर पंकजा मुंडे यांना दसरा मेळावा घेण्यास विरोध केला. पंकजा यांना दसरा मेळावा घेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. यावेळी राज्यात सत्ता भाजपाची होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते होते. तरी देखील ज्या गडावर मुंडे प्रेमी आणि भगवानबाबा भक्तांचा लाखोंचा जनसागर ऊसळतो त्या गडावर पंकजांना रोखण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैणात करण्यात आला होता. कारण काय तर महंतांना भगवानगड राजकारण मुक्त करायचा होता. यानंतर पंकजा यांनी स्वाभिमानी बाणा दाखवत भगवान भक्तीगडाची उभारणी केली.

हा झाला सारा इतिहास. पण गेल्या काही महिन्यांपासून भगवान गडावर राजकीय नेत्यांची मांदीयाळी जमत आहे. राजकारण मुक्त गडाचा नारा देणारे खुद्द महंत मुंबई येथे जाहीर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत एका व्यासपीठावर येणार आहेत. यामुळे राज्यातील लाखो मुंडे प्रेमींना प्रश्‍न पडला आहे. महंत नामदेव शास्त्री व त्यांच्या बोलवित्या धन्यांनी भगवान गड राजकारण मुक्त केला की, पंकजा मुंडे मुक्त केला? सोशल मीडियाच्या माध्यामातून मुंडेप्रेमी आवाज उठवत असून ज्या भगवानगडावरुन मुंडे यांना पंकजा दिसत होती तीच पंकजा महंतापासुन फडणवीस यांच्यापर्यंत सर्वांना जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी का दिसत असेल बरं? असे प्रश्‍न लोक विचारत आहेत. षडयंत्रकार्‍यांच्या कट- कारस्थानांना पुरुन ऊरणारी जनशक्ती अन् एका हाकेवर लाखोंच्या संख्येने उसळणारा जनसागर फक्त एका आदेशाची वाट पहात आहे, अशा पोस्ट मुंडेप्रेमी समाज माध्यमांत करत आहेत. याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button