पुणे : योग अंगारक संकष्टीचा… योग वाहतूक कोंडीचाही ! | पुढारी

पुणे : योग अंगारक संकष्टीचा... योग वाहतूक कोंडीचाही !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अंगारकी व संकष्टीचा योग आल्याने पुणेकरांनी मंगळवारी शहरातील प्रमुख मोठ्या मंदिरांत प्रचंड गर्दी केल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे पोलिस प्रशासनावर खूप ताण आला होता. पहाटे पाचपासून पुणेकरांनी मंगळवारी अंगारकी आणि संकष्टीच्या अपूर्व योगावर शहरातील विविध गणेश मंदिरांत गर्दी केली. तसेच, मंदिरासमोर विक्रेत्यांचे स्टॉलही लागल्याने रस्ते आणखी छोटे झाले होते. हार, फुले, मोदकांचे विविध प्रकार यांसह इतरही साहित्य विक्रेते रस्त्यावर गर्दी करून होते. पहाटेच्या वेळी बहुतांश पुणेकरांनी पाच वाजताच उठून गर्दी केली. मात्र, त्यावेळी रस्त्यावर वाहतूक नसल्याने पोलिस यंत्रणेवर ताण आला नाही. सकाळचे नऊ वाजले तशी शहरातील वाहतूक वाढली. पीएमपीसह सामान्य नागरिकांच्या वाहनांची ये-जा सुरू झाली. त्यामुळे सर्वत्र वाहतूक कोंडी दिसत होती.

रुग्णवाहिका अडकल्या…

मध्यवस्तीतील वाहतूक बंद केल्यामुळे आजूबाजूच्या मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचा मोठा ताण मंगळवारी आला होता. यात जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, नेहरू रस्ता, शास्त्री रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या कोंडीत अनेक ठिकाणी रुग्णवाहिका अडकल्याचे पाहायला मिळाले. सायंकाळी 4.30 च्या सुमारास शिवाजीनगरहून डेक्कनच्या दिशेने जाणार्‍या जंगली महाराज रस्त्यावर एक रुग्णवाहिका अडकली होती.

शिवाजी रोड केला बंद…
मंदिरात लोटलेल्या प्रचंड गर्दीला आवरताना पोलिसांची अक्षरश: दमछाक झाली. मंदिरात प्रवेशासाठी पाय ठेवायला जागा नसल्याने बाहेरून दर्शन घेणार्‍या भाविकांची संख्या दहापटीने जास्त होती. शिवाजी रोड या गर्दीमुळे सकाळपासूनच बंद होता. त्यामुळे चाकरमान्यांना खूप त्रास झाला. त्यांना वळसा घालून लांबच्या रस्त्याने कार्यालयात जावे लागले.

Back to top button