नगर : बाजार समित्यांचा मार्ग मोकळा ; 30 एप्रिलपर्यंत निवडणुका घेणार | पुढारी

नगर : बाजार समित्यांचा मार्ग मोकळा ; 30 एप्रिलपर्यंत निवडणुका घेणार

नगर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून वेध लागलेल्या जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांच्या निवडणुका 30 एप्रिलच्या आत घेण्याचे निर्देश नागपूर पाठोपाठ काल औरंगाबाद खंडपीठाने दिल्याची माहिती नगरच्या सहकार विभागाकडून समजली. दरम्यान, सर्वच बाजार समित्यांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, मात्र या यादीत डिसेंबरमध्ये झालेल्या 203 ग्रामपंचायत निवडणुकीतील 2165 सदस्यांचा समावेश नाही. त्यामुळे संबंधित सदस्य मतदानापासून वंचित राहणार का, शेतकर्‍यांना उमेदवारीची संधी आहे, मात्र त्यासाठी अटी, नियम काय, कोणत्या मतदार संघात तो उमेदवारी करणार, इत्यादी विषयी प्राधिकरणाकडून मार्गदर्शन नसल्याने संभ्रम कायम आहे.

जिल्ह्यात नगर, राहुरी, राहाता, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा आणि पारनेर बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. वास्तविकतः बहुतांशी बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत ही 2020-21 मध्येच संपलेली आहे. मात्र कोरोना कारणाने संचालक मंडळाला वर्षभराची मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर ती मुदतही संपली, पुढे औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार वरील 14 बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले.

आजपर्यंत हेच प्रशासक बाजार समित्यांचा कारभार हाकत आहेत. प्रशासकांच्या या राजवटीने आता नऊ महिन्यांचा कार्यकाल पूर्ण केला आहे. मात्र, अजुनही बाजार समित्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. मध्यंतरी निवडणूक घेण्याबाबत प्राधिकरणाने सूचना केल्या. उपनिबंधक गणेश पुरी यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम सुरू झाला होता 7 डिसेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांची अंतिम मतदार यादीही प्रसिद्ध करण्यात आली.

मात्र 22 डिसेंबर रोजी प्राधिकरणान 3 जानेवारीपर्यंत हा कार्यक्रम पुढे ढकलण्याच्या सूचना केल्या. नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवडड्यात झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बाजार समित्यांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठविली. मात्र 9 जानेवारी रोजी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होती. याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या सुनावणीत बाजार समित्यांच्या निवडणुका ह्या 30 एप्रिलच्या आत घेण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. या निर्देशामुळे नगर जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

Back to top button