Pakistan flour crisis | पाकिस्तानमध्ये उपासमारीचे संकट! गव्हाच्या पिठासाठी मारामारी, चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू (व्हिडिओ) | पुढारी

Pakistan flour crisis | पाकिस्तानमध्ये उपासमारीचे संकट! गव्हाच्या पिठासाठी मारामारी, चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू (व्हिडिओ)

इस्लामाबाद : पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानमध्ये अन्नधान्य तुटवड्याची समस्या गंभीर बनलीय. मुख्यतः गव्हाचे पीठ मिळत नसल्याने (Pakistan flour crisis) येथील लोकांवर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. पाकिस्तानच्या काही भागांमध्ये गव्हाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. खैबर पख्तुनख्वा, सिंध आणि बलुचिस्तान प्रांतातील बाजारपेठांत गव्हाचे पीठ मिळवण्यासाठी लोकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. काही ठिकाणी गव्हाचे पीठ मिळवताना चेंगराचेंगरी झाल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, पाकिस्तानमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात लोक गव्हाचे पीठ मिळवण्यासाठी एकमेकांशी भिडताना दिसून आले आहेत. आतापर्यंत पीठ मिळवताना झालेल्या मारामारीत आणि चेंगराचेंगरीत दोघांचा मृत्यू झाला आहे.

खैबर पख्तुनख्वामध्ये पिठाच्या किमतीवरून अनेक ठिकाणी मारामारी झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या एका घटनेत पिठाच्या किमतीवरून तंदूर मालकाशी झालेल्या झटापटीत गोळीबार झाला. यात एकजण ठार झाला होता. अनुदानित पीठ वाटपावेळी अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. तसेच दुसऱ्या एका ठिकाणी चेंगराचेंगरीत एक ४० वर्षीय मजूर हरसिंह कोल्ही याचा रस्त्यावर चिरडून मृत्यू झाला. द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, कोल्हीच्या कुटुंबीयांनी अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पाकिस्तानमधील एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, बाजारात गव्हाच्या पिठाचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे सरकारी अनुदानित पिठाच्या पिशव्या मिळविण्यासाठी रोज हजारो लोकांना तासनसास ताटकळक रहावे लागत आहे. पाकिस्तानमधील आर्थिक संकट गंभीर आहे. या परिस्थितीत गहू आणि पिठाचे भाव गगनाला भिडले आहेत. एका वृत्तानुसार, कराचीमध्ये गव्हाचे पीठ १६० रुपये प्रति किलोने विकले जात आहे. मात्र, इस्लामाबाद आणि पेशावरमध्ये १० किलो पिठाची पिशवी १,५०० रुपयांना विकली जात आहे.

गव्हाचा साठा संपला, संकट आणखी तीव्र होणार

१५ किलोची पिठाची पिशवी आता २,०५० रुपयांना विकली जात आहे. आतापर्यंत १५ किलोच्या पिठाच्या पिशवीचा दोन आठवड्यात ३०० रुपयांनी वाढला आहे, असे वृत्त एआरवाय न्यूजने दिले आहे. बलुचिस्तानमधील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री झामारक अचकझाई यांनी, काही भागातील गव्हाचा साठा पूर्णपणे संपला असल्याने संकट आणखी तीव्र होऊ शकते, अशी भिती व्यक्त केली आहे.

रशियातून गव्हाची आयात

दरम्यान, रशियातून आयात केलेल्या गव्हाची मोठी खेप कराची बंदरात दाखल झाली आहे. गव्हाने भरलेली दोन जहाजे सोमवारी कराची बंदरात पोहोचली. तसेच रशियातून अतिरिक्त ४ लाख ५० हजार टन गहू ग्वादर बंदरातून पाकिस्तानात पोहोचणार आहे. देशातील गव्हाचा तुटवडा पूर्ण करण्यासाठी पाकिस्तान सरकार एकूण ७५ लाख टन गहू आयात करत आहे. रशियाकडून खरेदी केलेला गहू ३० मार्चपर्यंत पाकिस्तानात पोहोचण्याची शक्यता आहे. रशियासोबतच इतर देशांतून आयात केलेला गहूही कराची बंदरात दाखल होत आहे. द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, कराची बंदरात ३ लाख ५० हजार टन गहूसाठा पोहोचला आहे. (Pakistan flour crisis)

हे ही वाचा :

Back to top button