

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : तहरिक – ए – तालिबान पाकिस्तानने पाकमध्ये समांतर सरकार स्थापन केल्यानंतर पाकिस्तान सध्या गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. दुसरीकडे ड्युरंड लाईन ही अफगाणिस्तान व पाकिस्तानमधील सीमारेषा आपण मानत नाही. खैबर पख्तुनख्वाँ हा अफगाणिस्तानचा भाग आहे, असे अफगाण तालिबानने जाहीर केले आहे. सीमेवर दोन्ही देशांदरम्यान तणावर आहेच. तहरिक-ए-तालिबान अलीकडे अधिकच सक्रिय बनल्याने देशांतर्गत स्थितीही बिघडलेली आहे. त्यात अर्थव्यवस्थाही कोलमडल्याने पाकिस्तान गृहयुद्धाच्या तोंडावर असल्याचे मानले जात आहे.
पाकिस्तानची निर्मिती इस्लामच्या आधारावर झाली. याउपर सौ फिसद शरियती निजाम (संपूर्ण इस्लामिक राजवट) पाकमध्ये लागू झाला नाही. शेजारच्या अफगाणिस्तानमध्ये मात्र तालिबानने तो कायम केला. यातून प्रेरित होऊन जमात उद दावा, लब्बैक, तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी), जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आदी पाकने निर्माण केलेल्या किंवा पाकच्या धोरणांमुळे निर्माण झालेल्या कट्टरपंथी संघटना आता पाकिस्तानमध्ये संपूर्ण इस्लामिक राजवट स्थापन करू पाहात आहेत. अफगाणिस्तानातील कम्युनिस्ट राजवटीविरोधात 1990 मध्ये अफगाण तालिबानची निर्मिती पाकिस्ताननेच केली होती. टीटीपी ही देखील पाकचीच निर्मिती. आता हे सगळे पाकसाठी भस्मासुर ठरत आहेत. पाकमधील बलुचिस्तान, सिंध या प्रांतांत स्वतंत्र होण्याच्या प्रेरणा व त्यासाठीचा झगडा पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच सुरू आहे. पंजाब आणि सिंध या पाकमधील दोन प्रांतांत विळा-भोपळ्याचे सख्य आहे. वजिरीस्तानातही परिस्थिती वेगळी नाही. डेरागाझीखानसह 6 जिल्ह्यांचे खैबरपख्तुनख्वाँ हे आधीच एक आंशिक स्वायत्त राज्य आहे. इथे तहरिक-ए-तालिबानचा प्रभाव वाढलेला असल्याने पाकिस्तानच्या अडचणींत वाढ झाली आहे. काश्मीरचा जो काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात सध्या आहे, तेथील लोकांशी पाक सरकारचा व्यवहार वसाहतीप्रमाणेच राहिला आहे. येथेही पाकविरोधात रोष आहे.
इस्लामच्या मजबूत पायावर पाकिस्तान ही बुलंद इमार उभी आहे, असा या देशाच्या निर्मात्यांचा दावा होता. तो बांगलादेशच्या निर्मितीने खिळखिळा ठरला. नंतर पाकने दहशतवादाला अधिकच प्रोत्साहन देणे सुरू केले. त्यामुळे आता पाकिस्तानच गोत्यात आलेला आहे. गृहयुद्धाच्या तोंडावर येऊन ठेपला आहे. गृहयुद्ध आणि सीमेवर अफगाणिस्तानशी युद्ध अशा प्रसंगात पाकचा किती निभाव लागेल, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल, पण पाकचा पराभव झाला तर खैबर पख्तुनख्वाँ, वजिरीस्तान, बलुचिस्तान आणि बचाकुचा पाकिस्तान अशा 4 तुकड्यात पाकचे विघटन ठरलेले आहे, असे सामरिक, राजकीय विश्लेषकांतून मानले जाते.