Raj Thackeray And Ashok Saraf : ”असा दागिणा सराफांच्या घरीच सापडतो”, राज ठाकरेंचे अशोक सराफांविषयी गौरवोद्गार | पुढारी

Raj Thackeray And Ashok Saraf : ''असा दागिणा सराफांच्या घरीच सापडतो'', राज ठाकरेंचे अशोक सराफांविषयी गौरवोद्गार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेते अशोक सराफ यांना उद्देशून ”असा दागिणा सराफांच्या घरीच सापडतो” असे मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मत व्यक्त केले. अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात अशोक सराफ यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

पुण्यात आज (दि. ८) सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त अशोक पर्व हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राज ठाकरे यांच्या हस्ते अशोक सराफ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, अशोक सराफ यांच्या अभिनयाची जादू आजही कायम आहे. हा देश चुकीच्या मार्गाला गेला नाही याचे कारण अशोक सराफ यांच्यासारख्ये कलाकार आहेत. यांच्यासारख्या कलाकारांचे विचार खूप महत्त्वाचे आहेत. हा असा दागिणा सराफांच्याच घरीच सापडतो, असे म्हणत राज ठाकरे यांनी सराफ यांच्याविषयी गौरवोद्गार काढले.

ते पुढे असेही म्हणाले की, परदेशात विमानातळांना कलाकारांची नावे आहेत. आमच्याकडे कलाकारांच्या नावाने चौक आहेत. मात्र त्यांच्या प्रतिभा जपल्या जात नाहीत. त्यामुळे कलाकारांचे महत्त्व काय असते हे परदेशात गेल्याशिवाय समजणार नाही.

अशोक सराफ दक्षिणेत असते तर मुख्यमंत्री असते

या सत्कार सोहळ्यावेळी सराफ यांच्याविषयी बोलत असताना राज ठाकरे यांनी गंमतीशीर मत व्यक्त केले. ते म्हणाले की, मला आज कळलं अशोक सराफ तुमचं मुळ गाव कर्नाटकात आहे. मला असं वाटलं तुम्हीच कर्नाटक सीमावाद सोडवलात. अशोक सरांचा सत्कार माझ्या हातून हे मोठे भाग्य आहे. खरं तर अशोक सराफ जर का दक्षिणेत असते तर ते आज मुख्यमंत्री असते. असे देखील ठाकरे यावेळी म्हणाले.

हेही वाचा

Back to top button