Suryakumar Yadav : सूर्यकुमारला शिकायचा आहे ‘ज्युनियर डिव्हिलियर्स’कडून ‘हा’ शॉट | पुढारी

Suryakumar Yadav : सूर्यकुमारला शिकायचा आहे 'ज्युनियर डिव्हिलियर्स'कडून 'हा' शॉट

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा स्‍टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने शनिवारी ( दि. ७ ) राजकोटमध्ये  श्रीलंकेविरुद्ध तिसरे टी-२० शतक झळकाले. नऊ षटकार आणि सात चौकार फटकावत त्‍याने ५१ चेंडूत नाबाद ११२ धावा केल्या. या धडाकेबाज खेळीमुळे जगभरातील क्रिकेटप्रेमींकडून त्‍याच्‍यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्‍या खेळीने सर्वांनाच प्रभावित करणार्‍या सूर्यकुमारने मात्र आपल्‍याला दक्षिण आफ्रिकेच्‍या ज्युनियर डिव्हिलियर्स  नावाने प्रसिद्ध असलेला युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसकडून नो-लूक’ शॉट शिकायचा असल्‍याचे म्‍हटलं आहे. (Suryakumar Yadav)

सूर्यकुमारने Mi टीव्हीने पोस्ट व्हिडिओतील ब्रेविससोबतच्या संभाषणात सांगितले की, ”  तू ज्‍या  पद्धतीने फलंदाजी करतोस मला तुझ्‍याकडून एक गोष्ट शिकवायची आहे, तो आहे नो-लूक शॉट, नो-लूक सिक्स कसा मारतोस? मला तुमच्याकडून हा शॉट शिकायचा आहे.” (Suryakumar Yadav) यावर ब्रेविसने उत्तर दिले की, माझ्यासाठी ही सन्मानाची गोष्ट असेल. पण, मला तुझ्‍याकडून अनेक नवे फटके कसे मारायचे हे  शिकायला आवडेल. गंमत म्हणजे मी नो-लूक शॉट कसा मारतो हे मला माहीत नाही. ब्रेविस हा दक्षिण आफ्रिकेतील आगामी क्रिकेट लीगमध्ये MI केपटाऊनचे प्रतिनिधित्व करणार आहे.

CSA T20 चॅलेंज गेममध्ये ५७ चेंडूत १६२ धावा केल्याबद्दल सूर्यकुमारने ब्रुईसचे कौतुक केले होते. तो म्हणाला होता,”काही दिवसांपूर्वी  वेळी मी तुला टी-२० सामन्यात १६२ धावा करताना पाहिले होते. आता एकदिवसीय सामन्यांमध्ये १०० चेंडूत फलंदाजीची संधी मिळाल्यास तिहेरी शतक झळकावता येईल का? असा प्रश्नही त्‍याने विचारला होता. यावर ब्रेविसने उत्तर दिले- माझ्यासाठी हा आणखी एक सामान्य दिवस होता. त्या क्षणी मी काय करत होतो हे मलाही कळले नाही, क्षणात सर्वकाही घडले.

सूर्यकुमारच्या शतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या टी- २०मध्ये श्रीलंकेसमोर २२९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. सूर्याशिवाय शुभमन गिलने ३६ चेंडूत ४६ धावा, राहुल त्रिपाठीने १६ चेंडूत ३५ धावा आणि अक्षर पटेलने ९ चेंडूत नाबाद २१ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ १६.४ षटकांत १३७ धावांवर गारद झाला. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.

हेही वाचा;

Back to top button