Opal : मंगळावर ओपल रत्नांचा ‘खजिना’! | पुढारी

Opal : मंगळावर ओपल रत्नांचा ‘खजिना’!

न्यूयॉर्क : Opal : ‘ओपल’ हे सफेद रंगाचे एक रत्न असते. त्याच्या रंगामुळे त्याला हिंदीत ‘दुधिया’ असेही म्हटले जाते. आता हे रत्न मंगळभूमीमध्ये अस्तित्वात असल्याचे संकेत मिळालेले आहेत. मंगळावरील एका कोरड्या पडलेल्या प्राचीन सरोवराच्या पात्रात अशा रत्नांचे अस्तित्व असावे असे ‘नासा’च्या मार्स क्युरिऑसिटी रोव्हरच्या डाटावरून समजले आहे. एके काळी तिथे सर्वत्र पाणी होते व कदाचित सूक्ष्म जीवांच्या स्वरूपात जीवसृष्टीही होती याचेही संकेत या संशोधनातून मिळाले आहेत.

Opal : मंगळाच्या गेल क्रेटर या विवरातील भेगा पडलेल्या खडकाळ भूमीत या रत्नांचे संकेत मिळालेले आहेत. मंगळाच्या जमिनीखाली पाणी व दगडांमध्ये क्रिया होत होती याचे हे लक्षण आहे. विशेष म्हणजे ही क्रिया आधीच्या अनुमानापेक्षा अगदी अलीकडच्या काळातील असावी असेही दिसून आले आहे. त्यामुळे मंगळावर सूक्ष्म जीवांच्या स्वरूपात जीवसृष्टी असावी याचेही संकेत मिळत आहेत. ‘जियोफिजिकल रिसर्चः प्लॅनेटस्’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Opal : परग्रहांवर जीवसृष्टीचा शोध घेत असताना वैज्ञानिक नेहमीच तेथील पाण्याच्या अस्तित्वाचा आधी शोध घेत असतात. याचे कारण म्हणजे जीवसृष्टीसाठी पाणी ही एक आवश्यक बाब ठरते. आता मंगळावर पाणी व खडकांमध्ये क्रिया होत होती हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कदाचित तिथे सूक्ष्म जीवांचेही अस्तित्व एके काळी असावे असे संकेत आहेत. या कोरड्या सरोवरातील फिकट रंगाच्या खडकांमध्ये अनेक भेगा आहेत. या भेगांमध्येच ओपलचे अस्तित्व असल्याचे संकेत मिळाले आहेत. ओपल रत्न तयार होण्यासाठी सिलिकायुक्त खडकांची पाण्याशी क्रिया व्हावी लागत असते.

हे ही वाचा :

कान्हूरपठार : खंडोबाच्या दर्शनासाठी दोन लाख भाविक

Yearly Horoscope 2023 : वृश्चिक : थोडी प्रगती, बरेच अडथळे

Back to top button