Yearly Horoscope 2023 : वृश्चिक : थोडी प्रगती, बरेच अडथळे | पुढारी

Yearly Horoscope 2023 : वृश्चिक : थोडी प्रगती, बरेच अडथळे

होराभूषण : रघुवीर खटावकर

वृश्चिक रास ही जलतत्त्वाची रास असून या राशीत विशाखा नक्षत्र चौथे चरण (वायू तत्त्व), अनुराधा नक्षत्र (पृथ्वी तत्त्व) ज्येष्ठा नक्षत्र (पृथ्वी तत्त्व) अशी नक्षत्रे आहेत.

वृश्चिक राशीत कोणताही ग्रह उच्च फल देत नसतो. चंद्र या राशीत नीच फल मात्र देऊ शकतो. वृश्चिक रास जल तत्त्व तर वृश्चिक राशी स्वामी मंगळ अग्नितत्त्वाचा आहे. वृश्चिक रास स्त्री रास आहे. तर वृश्चिक राशी स्वामी मंगळ पुरुष आहे. अशा प्रकारे विरोधाभास अलंकाराची नसल्यामुळे वृश्चिक राशीबद्दल गैरसमज फार आहेत. जन्मत: या व्यक्तींचा कोणताही स्वभाव असा तयार झालेला नसतो. यांचा स्वभाव यांना मिळणार्‍या अनुभवाने घडत असतो. यांना एखादा विशिष्ट अनुभव व्यक्तींकडून आला की, त्या व्यक्तीबद्दल झालेले त्यांचे मत कोणीही बदलू शकत नाही. या व्यक्ती चांगल्या प्रशासक असतात. चांगले काम करून घेतल्याबद्दल बरेच बॉस लोक यांच्यावर खूश असतात. तर खालच्या व्यक्ती मात्र त्यांच्यावर नाखूश असतात.

या वर्षी 17 जाने 2023 रोजी शनि कुंभ राशीत प्रवेश करत आहे. तो वृश्चिक राशीसाठी सुवर्णपादाने येत असल्यामुळे चिंता करायला लावणारा आहे. शनि कुंभ राशीत अडीच वर्षे राहणार आहे. शनि वृश्चिक राशीला चौथा येत असल्यामुळे तो या व्यक्तींना कनिष्ठ फलदायी राही. हा शनि स्वजनांची हानी करणारा, धननाश करणारा, गृहचिंता लावणारा व अनपेक्षित स्थित्यंतर करायला लावणारा राहील. परंतु हा स्वराशीतील शनि उच्च शिक्षण घेण्यास अनुकूल राहील. नातेवाईकांच्या समस्या सोडवाव्या लागतील. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. स्वत:च्या प्रकृतीकडेही लक्ष द्यावे.

यावर्षी नेपच्यून 18 फेब्रुवारी 2023 रोजी मीन राशीत प्रवेश करील तो ताम्रपादाने येत असल्यामुळे वृश्चिक राशी व्यक्तींना श्रीप्राप्ती म्हणजे धनसंपदा, विद्याधन, यश प्राप्ती होईल. हा नेपच्यून पुढे 14 वर्षे मीन राशीत राहणार आहे. तो वृश्चिक राशीच्या पंचमस्थानी राहील. गूढ शास्त्राची आवड निर्माण करेल. प्रकाशकांना अनुकूलता भासेल. यावर्षी गुरू हा 21 एप्रिल 2023 पर्यंत मीन राशीत वृश्चिक राशीच्या पंचम स्थानी राहील. या काळात विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा पाया घट्ट केला पाहिजे. शिक्षणात फार मोठी आघाडी घेतील व त्याचा उपयोग भविष्यातील वाटचाल प्रगतिपथावर ठेवण्यासाठी होणार आहे.

गुरू 21 एप्रिल 2023 रोजी मेष राशीत प्रवेश करील. वृश्चिक राशीसाठी गुरू सुवर्णपादाने येत असल्यामुळे त्याच्या कारकत्वाची फळे पूर्णपणे मिळण्यासाठी चिंता राहील. हा गुरू राशीला 6 वा आहे. तो कौटुंबिक त्रास निर्माण करेल. स्वजनांशी वैर निर्माण करील. रोगपीडा जाणवेल. मानसिक अस्वस्थता राहील. पण हाताखालील नोकर विश्वासू भेटतील. मामा, आत्या यांचेकडून लाभ होईल. कोणतेही समारंभ सुखरूपपणे पार पडतील.

वृश्चिक राशीच्या षष्ठस्थानी एप्रिलनंतर हर्षल व राहू राहणार आहेत. धंदा व्यवसायात विक्षिप्त व्यक्ती भेटतील. षष्ठातील राहू अग्रही राहून अनेक अडचणीतून विजय खेचून आणाल. वृश्चिक राशीच्या तृतीयस्थानी प्लुटो राहील. विस्तृत व मोठ्या योजना आखाल. मोठे प्रमाण गाजवाल. भावंडांशी जमवून घ्या.

वृश्चिक राशीला रवि तिसरा मकरेत (जाने-फेब्रु), 6 वा मेषेत (एप्रिल-मे), 10 वा, 11 वा सिंहेत – कन्येत (ऑगस्ट-सप्टें-ऑक्टो.) नेहमीच यश देणारा आहे. या काळात सर्जनशील राहाल. एखादी नवीन संधी कमी श्रमात लाभेल. बढती मिळेत, खेरदी-विक्री वाढेल.

वृश्चिक राशीला रवि चौथा कुंभेत (फेब्रु-मार्च), 8 वा मिथुनेत (जून-जुलै), 12 वा तुळेत (ऑक्टो-नोव्हे.) अशुभ राहील. तो गृहसौख्याची काळजी लावेल. धंद्यातील मंदीमुळे किंवा स्पर्धेमुळे करेल. मोठे खर्च निघतील.

वृश्चिक राशिस्वामी मंगळाचे यावर्षी वृषभ ते वृश्चिक या राशीतून भ्रमण होत राहील. कर्केतील व सिंहेतील (मे-जून-जुलै-ऑगस्ट), मंगळाच्या भ्रमणामुळे गृहसौख्य बिघडेल. धंदा व्यवसायात अस्थिरता निर्माण होईल. पण प्रॉपर्टीची कामे होतील. अपेक्षेप्रमाणे आर्थिक लाभ होतील. ऑगस्टनंतरच्या मंगळाच्या भ्रमणात वृश्चिक राशीच्या व्यक्तंना भावनावेग आवरला पाहिजे.

वृश्चिक राशीच्या 6 व्या 7 व्या स्थानातून म्हणजे वृषभेतून होणारे (मार्च एप्रिल) शुक्राचे भ्रमण शत्रू वा स्पर्धक वाढविणारे व भावनिक दडपण निर्माण करणारे राहील. वृश्चिक राशीच्या 10 व्या स्थानातून म्हणजे सिंह राशीतून शुक्राचे भ्रमण धंदा व्यवसायच्या दृष्टीने अशुभ राहील. धंदा व्यवसायाकडे दुर्लक्ष झाल्यास मोठे नुकसान होऊ शकते. एकदंरीत वर्षाच्या सुरुवातीचे 3 महिनेच गुरूचे भ्रमण चांगले राहणार आहे.

शनिचे भ्रमण अशुभ असले तरी स्वराशीतील शनि प्रॉपर्टी, बागायतीसंबंधीची काही कामे करायला मदत करणारे आहे. तरीही प्रत्येक कामात विलंब अडचणी, त्रास यांचा अनुभव घ्यावा लागणार आहे. ‘थोडी प्रगती व बरेच अडथळे’ असे हे वर्ष राहील.

Back to top button