गडचिरोली : सशस्त्र नक्षल्यांची वनकर्मचाऱ्यांना मारहाण; चार मोटारसायकली जाळल्या | पुढारी

गडचिरोली : सशस्त्र नक्षल्यांची वनकर्मचाऱ्यांना मारहाण; चार मोटारसायकली जाळल्या

गडचिरोली ; पुढारी वृत्तसेवा : रस्त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेले वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सशस्त्र नक्षल्यांनी मारहाण करुन त्यांच्या ४ मोटारसायलींचीही जाळपोळ केली. ही घटना काल (गुरूवार) संध्याकाळी अहेरी तालुक्यातील नैनेर-कापेवंचा मार्गावर घडली.

कमलापूर वनपरिक्षेत्राचे अधिकारी व्ही. एस. भोयर, वनपाल एस. एम. येडलावार, वनरक्षक प्रमोद तोडासे, हेमंत बोबाटे, क्षेत्रसहायक राजू मेडलावार आणि सर्वेअर गणेश रेपलवार हे कारसपल्ली रस्त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी मोटारसायकलने गेले होते. काम आटोपून परत येत असताना २५ ते ३० नक्षली जंगलात दबा धरुन बसल्याचे दिसून आले. त्यातील चार-पाच नक्षल्यांनी वनकर्मचाऱ्यांना अडवून त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या चार मोटारसायकलींचीही जाळपोळ केली.

रात्री उशिरा वनकर्मचारी पायीच कमलापूर येथे पोहचले. घटनास्थळी नक्षल्यांच्या विभागीय समितीचा सचिव, कमांडर व अन्य कॅडर होते, अशी माहिती आहे. तक्रारीवरुन पोलिसांनी नक्षल्यांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांनी दिली.

अलीकडे गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात नक्षल्यांनी धुडगूस घातला असून, हत्या, जाळपोळ आणि बॅनर लावून धमकी देण्याचे सत्र अवलंबिले आहे. यामुळे त्या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा :  

Back to top button