डोंबिवली सामूहिक अत्याचारकांड : आणखी दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या | पुढारी

डोंबिवली सामूहिक अत्याचारकांड : आणखी दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली सामूहिक अत्याचारकांड प्रकरणाचे पडसाद देशभर उमटले. डोंबिवलीच्या मानपाडा पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे. अल्पवयीन मुलीवरील सामूहिक अत्याचारकांडाने समाजमन सुन्न झाले. दुसऱ्या दिवशी पहाटे या प्रकरणातील आणखी दोघा आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यामुळे अटक आरोपींची संख्या आता 22 झाली आहे. या सर्व आरोपींना कोर्टाने 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याच डोंबिवली सामूहिक अत्याचारकांड मध्ये सहभागी असलेल्या दोघा अल्पवयीन आरोपींची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीत 29 जणांची नावे

या प्रकरणातील (14 वर्षीय) तक्रारदार पीडितेने दिलेल्या फिर्यादीत 29 जणांची नावे घेतली आहेत. त्यापैकी आतापर्यंत 22 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी गुरुवारी पहाटे दोघांच्या मुसक्या बांधल्या.

तर अत्याचारकांडात समावेश असलेल्या दोघा अल्पवयीन आरोपींना भिवंडीच्या बालन्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर या दोघांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.

22 आरोपींना गुरुवारी सकाळीच कल्याण न्यायालयात हजर केले

अटक केलेल्या 22 आरोपींना गुरुवारी सकाळीच कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या कांडात काही महत्त्वाचे वैद्यानीक व तांत्रिक पुरावे गोळा करण्यासाठी आरोपींना 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली.

मात्र न्यायालयाने या आरोपींना 7 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे फर्मान सोडले. यातील 7 आरोपी अद्याप हाती लागले नसून पोलिसांची पथके त्यांना पकडण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत.

या पार्श्वभूमीवर कल्याण फौजदारी वकील संघटनेचे सहसचिव ॲड. प्रकाश जगताप यांनी संघटनेच्या सर्व सभासदांना विनंती वजा आवाहन केले आहे.

बलात्कार गुन्ह्यातील आरोपींचे वकिलपत्र वकिलांनी घेऊ नये

डोंबिवली सामूहिक बलात्कार गुन्ह्यातील आरोपींचे वकिलपत्र कोणीही वकिलांनी घेऊ नये. बलात्कार करणाऱ्या आरोपीचे वकीलपत्र वकील घेतात आणि आरोपी सुटतो. त्यामुळे बलात्कार करणाऱ्यांचे मनोधैर्य मनोबल वाढते.

बलात्कार गुन्ह्यांची संख्या कमी होण्याऐवजी ती दररोज वाढते आहे. त्यामुळे आपण स्वतः समाजातील घटक असल्यामुळे समाजासाठी काहीतरी देणे लागत आहे.

त्यामुळे  बलात्कारातील आरोपींचे वकीलपत्र महाराष्ट्रातील कुणीही वकिलांनी घेऊ नये, असेही आवाहन ॲड. जगताप यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

आता आपण जागृत होण्याची वेळ आलेली आहे. समाजाचे देणे देण्याची वेळ आलेली आहे.

त्यामुळे आपण सर्वांनी या भीषण परिस्थितीकडे लक्ष देऊन बलात्काराच्या गुन्ह्याला पायबंद घालण्यासाठीचे आपले प्रयत्न यशस्वी होतील.

सुदृढ समाजासाठी आपण बलात्कारी गुन्हेगारांचे वकीलपत्र घेऊ नये, असेही सहसचिव ॲड. प्रकाश जगताप यांनी त्यांच्या पत्रकात म्हटले आहे.

Back to top button