पुणे : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून काढणं पडलं महागात ! अ‍ॅडमीनची कापली जीभ | पुढारी

पुणे : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून काढणं पडलं महागात ! अ‍ॅडमीनची कापली जीभ

पुणे / फुरसुंगी : पुढारी वृत्तसेवा :  सोसायटीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून काढल्यावरून झालेल्या वादावादीत अ‍ॅडमीनच्या तोंडावर ठोसा मारल्याने जीभ दाताखाली सापडून कापली गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुरेश किसन पोकळे, सुयोग भरत शिंदे, अनिल म्हस्के, शिवराम पाटील, किसन पवार (सर्व रा. ओम हाइट्स, फुरसुंगी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकाच सोसायटीत राहतात. फिर्यादी सोसायटीच्या अध्यक्ष आहेत.

सुरेश पोकळे याने फिर्यादीचे पती किरण हरपळे यांना तुम्ही मला ओम हाइट्स ऑपरेशन या ग्रुपमधून रिमूव्ह का केले? असा मेसेज करून भेटायला बोलावले. दि. 28 डिसेंबरला रात्री दहा वाजता किरण हरपळे हे ऑफिसमध्ये असताना सुरेश पोकळे तेथे गेले. हरपळे यांनी त्यांना ग्रुपमध्ये कोणीही कसलेही मेसेज टाकतात. त्यामुळे आम्ही ग्रुपच बंद केला आहे, असे सांगितले. त्यावर पोकळे याने त्यांच्या तोंडावर ठोसा मारला. त्यात त्यांची जीभ दातांमध्ये सापडल्याने कापली गेली. इतरांनी त्यांचे पाय पकडून ठेवले. या मारहाणीत
जीभ कापली गेल्याने जिभेला दोन टाके घालावे लागले. पोलिस उपनिरीक्षक प्रताप शेळके तपास  करीत आहेत.

Back to top button