सम्मेद शिखर तीर्थासाठी बलिदान; उपोषणाअंती जैन मुनींचा देहत्याग | पुढारी

सम्मेद शिखर तीर्थासाठी बलिदान; उपोषणाअंती जैन मुनींचा देहत्याग

जयपूर; वृत्तसंस्था : झारखंडमधील जैन तीर्थस्थळ सम्मेद शिखर हे पर्यटन केंद्र म्हणून जाहीर करण्याच्या झारखंड राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात दहा दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेल्या जैन मुनी सुज्ञेयसागर महाराज (वय 72) यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले.

सांगानेर (जयपूर) येथे जैन मुनी सुज्ञेयसागर महाराज यांना समाधी देण्यात आली. सांगानेर संघीजी मंदिरातून सकाळी मुनींची अंत्ययात्रा (डोल यात्रा) काढण्यात आली. मोठ्या संख्येने जैन समुदायाचे लोक यावेळी उपस्थित होते. सांगानेरमध्ये श्री दिगंबर जैन वीरोदेय अतिशय तीर्थक्षेत्रात महाराजांना समाधी देण्यात आली.

गिरिडिह जिल्ह्यातील पारसनाथ डोंगराला झारखंड सरकारने पर्यटन केंद्र घोषित केले आहे. त्याविरोधात देशभरात जैन समाजातर्फे निदर्शने सुरू आहेत. पारसनाथ डोंगरावरील जैन धर्मियांचे सर्वोच्च तीर्थक्षेत्र सम्मेद शिखर म्हणून जगप्रसिद्ध आहे.

मुनी समर्थ सागर यांचे बेमुदत उपोषण सुरू

आता मुनी समर्थ सागर यांनी सम्मेद शिखर तीर्थक्षेत्राच्या बचावासाठी बेमुदत उपोषण पुकारले आहे.

कर्मभूमी मुंबईतील अंधेरी

मुनी सुज्ञेयसागर यांचा जन्म राजस्थानातील जोधपूर जिल्ह्यातील बिलाडा येथे झाला होता; पण अंधेरी, मुंबई ही त्यांची कर्मभूमी होती. त्यांनी गिरनार, बांसवाडा तसेच सम्मेद शिखरमध्ये विविध प्रकारच्या दिक्षा घेतल्या होत्या. त्यांचे मूळ नाव नेमीराज होते.

अधिक वाचा :

Back to top button