वणवे टाळण्यासाठी जुन्नर वन विभाग दक्ष; वणवे लावणार्‍यांवर होणार कठोर कारवाई | पुढारी

वणवे टाळण्यासाठी जुन्नर वन विभाग दक्ष; वणवे लावणार्‍यांवर होणार कठोर कारवाई

जुन्नर; पुढारी वृत्तसेवा : प्रत्येक वर्षी हजारो हेक्टर जंगलांचे क्षेत्र वणव्याच्या चपेटमध्ये येते. त्यामुळे वातावरण प्रदूषित होते व संपूर्ण सजीवसृष्टीवर परिणाम होत आहे. जुन्नरमध्येही वनसंपदा असून, ती वणव्यांपासून वाचावी, यासाठी वन विभाग दक्ष झाला आहे. वणवे लावणार्‍यांवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. जंगलांना वणवा लागला तर हवेतील ऑक्सिजनवर परिणाम होतोच; परंतु शेतकरीवर्गासही त्याची झळ मोठ्या प्रमाणावर सोसावी लागत आहे. वणव्यामुळे त्या ठिकाणचे प्राणी सैरभैर होतात.

असंख्य कीटक मारले जातात. परिणामी, परागीभवनाची प्रक्रिया थांबते. परिणामी, अन्नधान्य उत्पादनात घट होते. आधीच बाजारभाव व शेतमालावरील रोगांमुळे हवालदिल झालेला शेतकरी अजून तोट्यात येतो. त्यामुळे वणवे टाळून वनांचे संवर्धन व जनजागृती चळवळ उभी राहणे आवश्यक आहे. जागतिक तापमानवाढसारख्या भस्मासुरास वेळेतच अशा जनजागृतीमुळे रोखले जाऊ शकते. त्यासाठी जुन्नर वन विभागाने सूचना जारी केल्या आहेत.

वणवा लावल्यास भारतीय वन अधिनियम 1927 नुसार 2 वर्षे कारावास व 5000 रुपये दंड होईल. वन विभाग जुन्नरमार्फत वणव्यासारख्या भयंकर घटनेला आळा घालण्यासाठी या वर्षी बक्षीस देण्यात येणार आहे. आग लावणार्‍या व्यक्तीची जो कुणी माहिती देईल, त्यास बक्षीस देण्यात येईल व नाव सांगणार्‍या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. वन विभागामार्फत वणव्यांपासून सुरक्षितेचे उपाय म्हणून वनामध्ये जाळरेषा काढल्या आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीला वणव्यांपासून सुरक्षिततेबाबत अवगत केले आहे. रात्री गस्तीदरम्यान ग्रामस्थांना फिरत्या लाऊडस्पीकरच्या वाहनातून सूचना गावोगावी फिरून देण्यात येत आहेत. तसेच, आग पथके तैनात केल्याचे जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले.

जुन्नर वन विभागाने जारी केलेल्या सूचना
शेतात आग पेटवू नका. पेटवलीच तर ती विझवल्याशिवाय कुठेही जाऊ नका.
शेतात विडी, सिगारेटची पेटती थोटके न विझवता फेकू नका.
जंगलात शेकोटी पेटवू नका.
हिरडा गोळा करताना झाडाखालील गवत पेटवू नका.
मधमाश्यांचे पोळ जाळू नका.
वणवा लागल्याचे निदर्शनास येताच वन विभागाशी संपर्क करा व वणवा विझविण्यासाठी मदत करा.
आग लावणार्‍या व्यक्तीची माहिती वन विभागास कळविण्यासाठी मदत करा.
ट्रेक करताना आपल्याकडून कुठेही वणवा लागू नये म्हणून पर्यटकांमध्ये जनजागृती करा.
ग्रामसभेमध्ये वणव्यांपासूनचे धोके नागरिकांना सांगा.
झाडे लावा, झाडे जगवा.

Back to top button