नगर : कांदा व्यापार्‍याची रोकड राहुरीतून लांबविली | पुढारी

नगर : कांदा व्यापार्‍याची रोकड राहुरीतून लांबविली

राहुरी : पुढारी वृत्तसेवा  : शहरातील नगर – मनमाड महामार्गावरील पाण्याची टाकी परिसरात एका कांद्याच्या व्यापार्‍याच्या चारचाकीतून सुमारे 6 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना काल भरदिवसा दुपारच्या सुमारास घडली आहे.  राहुरी येथील व्यापारी संतोष शेतकर्‍यांना रक्कम देण्यासाठी बँकेतून 6 लाख रुपये काढून आपल्या चारचाकी वाहनातून जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांच्या चारचाकीचा वेग कमी झाल्यावर टायरखाली तीक्ष्ण वस्तू टाकून त्यांची चारचाकी पंक्चर केली. त्यानंतर बाफना यांना तुमची गाडी पंक्चर झाली आहे, असे सांगितले.

बाफना यांची गाडी पंक्चर झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी आपली चारचाकी गाडी जवळच असलेल्या एका पंक्चरच्या दुकानाजवळ नेली असता त्या भामट्यांनी त्यांचे लक्ष विचलित करून काही क्षणात त्यांच्या गाडीतून 6 लाख रुपये रोकड असलेली पिशवी घेऊन धूमस्टाईलने पोबारा केला. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी पथके पाठविली आहेत.

Back to top button