Rishabh Pant Car Accident | डुलकी लागली अन् कार रेलिंगला धडकली, ऋषभ पंतच्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर | पुढारी

Rishabh Pant Car Accident | डुलकी लागली अन् कार रेलिंगला धडकली, ऋषभ पंतच्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर

डेहराडून; पुढारी ऑनलाईन : भारताचा क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant Car Accident) याच्या कारला दिल्लीहून त्याच्या घरी परतताना असताना आज शुक्रवारी पहाटे अपघात झाला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. डेहराडूनपासून सुमारे ९० किमी अंतरावर असलेल्या हरिद्वार जिल्ह्यातील नारसन येथे हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्याची कार अपघातानंतर जळून खाक झाली आहे. पंतची कार दुभाजकाच्या रेलिंगला धडकल्याने हा अपघात झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज पंत कारमध्ये एकटाच होता. आज पहाटे ५.३० च्या सुमारास त्याची मर्सिडीज जीएलई कार दिल्ली-हरिद्वार महामार्गावरील दुभाजकाच्या रेलिंगला धडकली. त्यानंतर कारला आग लागली. या अपघातानंतर जवळच्या गावातील लोक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला कारमधून बाहेर काढले. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्याला डेहराडूनमधील मोठ्या रुग्णालयात नेण्यात आले, अशी माहिती हरिद्वार ग्रामीणचे पोलीस अधीक्षक स्वप्न किशोर सिंह यांनी दिली.

नातेवाइकांना भेटण्यासाठी तो रुरकीला जात होता. नारसनपासून रुरकीच्या दिशेने १ किमी पुढे जात असताना तो स्टिअरिंग व्हीलवर  झोपल्यामुळे हा अपघात झाला.. यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला, अशी माहिती स्वप्न किशोर सिंह यांनी दिली.

”पंतच्या कपाळावर, हाताला आणि उजव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. पण, तो शुद्धीत असून बोलू शकतो. तो चालवत असलेली कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने तो या भीषण अपघातातून बचावला आहे.” असेही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. रस्त्यावर पहाटे कुठेही धुके नव्हते. पण कार चालवताना पंतला डुलकी लागल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले असावे, अशी शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पंतला डाव्या डोळ्याच्या वर दुखापत झाली आहे. पाठीवर आणि उजव्या गुडघ्यालालाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर जळालेली कार पुढील तपासासाठी नेण्यात आली आहे. कारमधील एअरबॅग उघडली होती की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही.

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत एका दुर्दैवी रस्ता अपघातात जखमी झाल्याची बातमी मिळाली. त्यांच्या उपचाराची पूर्ण व्यवस्था करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. तो लवकरात लवकर बरा होण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट करत म्हटले आहे.

या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ट्विट करत पंत लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना केली आहे. (Rishabh Pant Car Accident) दरम्यान, ऋषभ पंतवर मॅक्स रुग्णालय डेहराडून येथे उपचार सुरू आहेत. गरज पडल्यास त्याला एक-दोन दिवसांत दिल्लीला नेले जाईल, अशी माहिती दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हे ही वाचा :

Back to top button