भारताचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंत अपघातात गंभीर जखमी, दिल्लीहून परतताना कार दुभाजकाला धडकली | पुढारी

भारताचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंत अपघातात गंभीर जखमी, दिल्लीहून परतताना कार दुभाजकाला धडकली

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्या मर्सिडीज जीएलई कारला दिल्लीहून घरी परतताना असताना अपघात झाला. हम्मदपूर झालजवळ रुरकीच्या नारसन सीमेवर त्यांच्या कारला अपघात झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. पंतच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे.

ऋषभला उपचारासाठी डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतच्या कपाळाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ऋषभची कार दुभाजकाला जाऊन धडकली. त्यानंतर कारला आग लागली. यात ऋषभ गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर त्याला दिल्ली रस्त्यावरील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ऋषभ पंत कारमधून दिल्लीहून रुरकीच्या दिशेने येत होता. रुरकी येथे त्याचे घर आहे. दरम्यान, नारसन जवळ त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती दुभाजकाला आणि खांबाला जाऊन धडकली. यामुळे कारला आग लागली.

या घटनेची माहिती मिळताच देहातचे पोलीस अधीक्षक स्वप्न किशोर सिंह घटनास्थळी पोहोचले. सक्षम हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सुशील नागर यांनी सांगितले की, सध्या ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी जखमी ऋषभ पंतच्या उपचारासाठी सर्व शक्य व्यवस्था करा आणि गरज पडल्यास एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

हे ही वाचा :

Back to top button