नगर : पाथर्डी शहरात गटार, रस्त्यांचे प्रश्न रखडले ; प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम | पुढारी

नगर : पाथर्डी शहरात गटार, रस्त्यांचे प्रश्न रखडले ; प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  पाथर्डी नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र.1 मधील संत वामनभाऊनगर व आनंदनगर मधील अर्धवट राहिलेली गटार व रस्ता तत्काळ पूर्ण करावा. या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गट व स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनाला निवेदन दिले असून हे काम त्वरित सुरू न केल्यास कोणत्याही क्षणी शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.
शहरातील नागरिकांनी अनेकदा नगरपालिका व नगरसेवक यांच्याशी संपर्क केला, तरीही संत वामनभाऊ नगर मधील किशोर कराड व संजय राजगुरु यांच्या घरासमोरील रस्ता सहा महिन्यांपासून अर्धवट स्थितीत अडकून पडला आहे.

तसेच आनंदनगर मधील अर्जुना लॉन्सच्या मागील अर्धवट गटारीचे काम मागील एक वर्षापूर्वीं निवेदन व आश्वासन देऊनही काम मार्गी लागत नाही. अनेक घराचे सांडपाणी रस्त्यावर व मोकळ्या जागेत सोडल्यामुळे डेंगू, मलेरिया आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी व नागरिकांनी काल पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. शिवसेना तालुका प्रमुख भगवानराव दराडे, युवासेना शहर अधिकारी सचिन नागापूरे,भाऊसाहेब धस, अजिनाथ भापकर, विकास दिनकर, आदर्श काकडे, आनंदनगर व संत वामनभाऊनगर येथील श्रीकांत काळोखे, किशोर कराड, मधुकर चन्ने आदी निवेदन देताना उपस्थित होते. येत्या पंधरा दिवसामध्ये अर्धवट राहिलेला रस्ता व गटार तत्काळ पूर्ण करून द्यावा, अन्यथा शिवसेना युवासेना आंदोलन करणार आहे.

अतिक्रमणाचा विळखा

नगरपालिका प्रशासनाचे शहराकडे दुर्लक्ष झाल्याने अतिक्रमणाच्या विळख्यात शहर अडकले आहे. लोकांच्या नागरिक समस्येसंदर्भात पालिकेचा हलगर्जीपणा सुरू आहे. विकासाची कामे वेळेवर होण्यासाठी पालिका प्रशासन बेजबाबदारीने काम करत नसल्यामुळेच अर्धवट कामे झाले आहे. रस्ता व गटार ठेकेदारांकडून काम करुन घेण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. हे काम पूर्ण झाले नाही, तर येत्या पंधरा दिवसात नगरपालिका व ठेकेदाराच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख दराडे यांनी दिला आहे.

Back to top button