AUSvsSA Boxing Day Test : कॅरी-ग्रीनचा द. आफ्रिकेला तडाखा, कांगारूंनी रचला धावांचा डोंगर | पुढारी

AUSvsSA Boxing Day Test : कॅरी-ग्रीनचा द. आफ्रिकेला तडाखा, कांगारूंनी रचला धावांचा डोंगर

पुढारी ऑनलाईन डेस्क : AUSvsSA Boxing Day Test : ॲलेक्स कॅरी (111), ट्रॅव्हिस हेड (51), कॅमरून ग्रीन (51) यांनी केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने बॉक्सिंग डे कसोटीच्या तिस-या दिवशी 8 बाद 575 धावांचा डोंगर रचून आपला पहिला डाव घोषित केला. याचबरोबर पाहुण्या द. आफ्रिकेविरुद्ध यजमान कांगारूंनी 386 धावांची भक्कम आघाडी मिळवली. द. आफ्रिकेच्या नॉर्टजेने 3, रबाडाने 2 विकेट घेतल्या, तर मॉर्को जेन्सन आणि एनगिडी यांनी 1-1 बळी मिळवला.

प्रत्युत्तरात द. आफ्रिकेच्या दुस-या डावाची पुन्हा एकदा खराब सुरुवात झाली. पॅट कमिन्सने त्यांना दुस-याच षटकाच्या तिस-या चेंडूवर मोठा धक्का दिला. कर्णधार डीन एल्गर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर तिस-या दिवसाअखेर द. आफ्रिकेने 1 बाद 15 धावांपर्यंत मजल मरता आली. सरेल एरवी (7) आणि थ्युनिस डी ब्रुयन (6) हे क्रिजवर आहेत. (AUSvsSA Boxing Day Test warner double century alex carey century)

तिस-या दिवसाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाला लागोपाठ तीन धक्के

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या तिस-या दिवशी (बुधवारी) 3 बाद 386 धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र त्यांना 395 धावांवर त्यांची चौथी आणि पाचवी विकेट पडली. 93 व्या षटकाच्या तिस-या चेंडूवर ट्रॅव्हिस हेड (51) क्लिन बोल्ड झाला. त्याने बाद होण्यापूर्वी या षटकाच्या दुस-या चेंडूवर आपले 11 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले होते. हेड बाद झाल्यानंतर दुखापतग्रस्त वॉर्नर पुन्हा फलंदाजीला मैदानात उतरला. पण 93 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर नॉर्टजेने वॉर्नरला (200) आल्या पावली माघारी धाडले. त्यानंतर पॅट कमिन्सही (4) फारसे योगदान देऊ शकला नाही. रबाडाने त्याची शिकार केली. अशाप्रकारे तिसऱ्या दिवसाची सकाळ दक्षिण आफ्रिकेसाठी चांगली ठरली.

यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरी आणि केमरून ग्रीनची शतकी भागिदारी

या सगळ्यात कांगारूंचा यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरी खेळपट्टीवर नांगर टाकून उभा राहिला. त्याने पहिल्यांदा नॅथन लियॉनच्या सोबतीने संघाच्या धावफलकात 40 धावा जोडल्या. 440 धावसंख्येवर लियॉन (25) लुंगी एनगिडीचा बळी ठरला. यानंतर जखमी कॅमेरून ग्रीन फलंदाजीला आला आणि त्याने कॅरीला खंबीर साथ दिली. दोघांनी संयमी तसेच आक्रमक खेळीचे प्रदर्शन करत 8 विकेट्ससाठी शतकी भागीदारी रचली. यादरम्यान कॅरीने 133 चेंडूत आपले कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. याचबरोबर तो बॉक्सिंग डे कसोटीत शतक ठोकणारा दुसरा ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक ठरला. कॅरीपूर्वी कांगारूंचे माजी यष्टिरक्षक रॉड मार्श यांनी बॉक्सिंग डे कसोटीत असा पराक्रम केला होता. (AUSvsSA Boxing Day Test warner double century alex carey century)

शतक पूर्ण केल्यानंतर कॅरी फार काळ टिकला नाही. त्याला 111 च्या वैयक्तिक धावसंख्येवर मार्क यानसेनने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे कॅरी आणि ग्रीन यांच्यातील 112 धावांची भागीदारी खंडित झाली. यानंतर ग्रीनने चहापानाच्या विश्रांतीपूर्वी 174 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मंगळवारी सामन्याच्या दुस-या दिवशी ग्रीनच्या हाताला दुखापत झाली होती, त्यानंतरही तो फलंदाजीला आला आणि 51 धावा करून नाबाद परतला. चहापानाच्या विश्रांतीपर्यंत ऑस्ट्रेलियाने 8 विकेट्सवर 575 धावा करून डाव घोषित केला. (AUSvsSA Boxing Day Test warner double century alex carey century)

कॅरीचे ऐतिहासिक बॉक्सिंग डे कसोटी शतक!

ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज ॲलेक्स कॅरीने द. आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई करून बॉक्सिंग डे कसोटीच्या तिस-या दिवशी शतक झळकावले. कांगारू संघासाठी बॉक्सिंग डे कसोटीत शतक झळकावणारा तो इतिहासातील दुसरा विकेटकीपर फलंदाज ठरला आहे. कॅरीने 15 व्या कसोटीत तीन आकडी धावसंख्या गाठली. त्याने कसोटी करीयरमधील पहिले शतक 133 चेंडूत पूर्ण केले. मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात कॅरी 7 व्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला. त्यावेळी संघाची धावसंख्या 400 होती. त्यानंतर त्याने चौफेर फटकेबाजी करून स्वत:चे पहिले शतक तर पूर्ण केलेच पण त्याचबरोबर त्याने संघाला मोठी आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

  • गेल्या 9 वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा कॅरी हा पहिला ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक ठरला आहे. याआधी 2013 साली ऑस्ट्रेलियाकडून यष्टीरक्षक ब्रॅड हॅडिनने ॲशेस मालिकेतील ॲडलेड कसोटीत शतक पूर्ण केले होते.
  • यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे माजी दिवंगत यष्टीरक्षक रॉड मार्श यांनी 1977 मध्ये ॲशेस मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटीत शतकी खेळी साकारली होती.

Back to top button