बेळगाव : आर. व्ही. देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट विधानसभापटू पुरस्कार | पुढारी

बेळगाव : आर. व्ही. देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट विधानसभापटू पुरस्कार

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : कारवार जिल्ह्यातील हल्ल्याळचे आमदार, माजी मंत्री रघुनाथराव विश्वनाथराव उर्फ आर. व्ही. देशपांडे यांना 2022 चा सर्वोत्कृष्ट आमदार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, कायदा व संसदीय कामकाज मंत्री जे. सी. मधुस्वामी, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या हस्ते त्याना हा पुरस्कार बुधवारी प्रदान करण्यात आला. आज सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू होताच सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी पुरस्काराची घोषणा केली.

8 वेळा आमदार

1947 मध्ये जन्मलेले आर. व्ही. देशपांडे यांनी बी. ए., एलएलबी पदवी प्राप्त केली आहे. हल्ल्याळचे भू विकास बँकेचे अध्यक्ष म्हणून आर.व्ही. देशपांडे कार्यरत आहेत. 1983 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. ते आतापर्यंत 8 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सध्या त्यांना या सभागृहात सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा मान मिळाला आहे. लघु उद्योग, मोठे आणि मध्यम उद्योग, कृषी, फलोत्पादन, महसूल, कौशल्य विकास आणि इतर अनेक खात्यांचे मंत्री म्हणून त्यांना अनुभव आहे. माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाढलेले आर. व्ही. देशपांडे यांनी किमान 10 मुख्यमंत्र्यांसोबत काम केले आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि 2004 मध्ये विधानसभेचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून काम केले आहे. सभागृहाच्या नियमाच्या चौकटीच्या पलीकडे न जाता बोलण्याचा त्यांना अनुभव आणि ज्ञान आहे. ते एक उत्कृष्ट संसदपटू तर आहेतच पण तिरुपती तिरुमला मंदिराचे विश्वस्त आणि हल्ल्याळ येथील तुळजा भवानी मंदिराचे विश्वस्त म्हणून धार्मिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातही काम करत आहेत. त्यांनी कॅनरा मेडिकल सेंटरच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातही योगदान दिले आहे. हे त्यांच्या सामाजिक कार्याचे उत्तम उदाहरण आहे, अशा शुभेच्छा अध्यक्ष हेगडे कागेरी यांनी त्यांना दिल्या.

ज्येष्ठ आणि मार्गदर्शक आर. व्ही. देशपांडे यांची सर्वोत्कृष्ट आमदार पुरस्कारासाठी निवड झाल्याने पुरस्काराचा सन्मान व मोल वाढल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा

Back to top button