चक्क उघड्यावर जाळला जातोय कचरा! कुरकुंभ एमआयडीसीमधील प्रकार | पुढारी

चक्क उघड्यावर जाळला जातोय कचरा! कुरकुंभ एमआयडीसीमधील प्रकार

कुरकुंभ (ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात चक्क उघड्यावर कचरा जाळला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा गंभीर प्रकारामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. संबंधित कंपनीच्या कचऱ्याच्या आगीमुळे दुर्दैवी घटना घडल्यास गावकऱ्यांनी पुन्हा गाव सोडून पळायाचे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हे कृत्य करणार्‍या कंपनीवर प्रशासन तातडीने कारवाई करणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्र केमिकल झोन असून, मोठ्या प्रमाणात केमिकल कंपन्या आहेत. शासकीय नियम आणि अटींना पायदळी तुडवून काही कंपन्यांचा कारभार सुरू असतो. प्रदूषण, अपघात, स्फोट व आगीच्या घटना येथे सतत घडतात. स्फोट, आगीच्या घटनांमुळे गावकऱ्यांवर कायम टांगती तलवार आहे. कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळे कधी काय होईल, हे सांगता येत नसून कुरकुंभ, पांढरेवाडी हद्दीतील नागरिकांना दहशतीखाली दिवस काढावे लागत आहेत. यापूर्वी आग लागणे, स्फोट होणे, अशा भीषण घटना घडल्या आहेत. त्यामुळे कंपन्या व केमिकल साठा जळून खाक झाला आहे.

काही कंपन्यांत तर बेसुमार केमिकल साठा असून, अनेक बॅरल उघड्यावर ठेवले जातात, हे धोकादायक आहे. मात्र, याकडे औद्योगिक क्षेत्रातील संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. एमआयडीसी हद्दीत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा राडारोडा टाकला जात असून, सर्वत्र घाण पसरली आहे. हे कृत्य कंपन्यांची साफसफाई करणार्‍या ठेकेदाराकडून केले जात आहे. कंपन्यांचा आतील परिसर स्वच्छ ठेवून बाहेर कचरा, बांधकामाचा राडा, प्लास्टिक, पालापाचोळा टाकला जात आहे. बहुतांश भागात अशीच स्थिती असून, कचरा जाळला जात आहे. त्यामुळे भीषण दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. याबाबत पाहणी करून संबंधित कंपन्यांवर कारवाई करणे गरजेचे झाले आहे.

Back to top button