पुणे : ‘रॅपिडो’च्या अडचणीत वाढ; गुन्ह्यातील कलमे वाढविली | पुढारी

पुणे : ‘रॅपिडो’च्या अडचणीत वाढ; गुन्ह्यातील कलमे वाढविली

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालविल्याबद्दल पुणे आरटीओने हैदराबाद येथील रॅपिडो या बाईक टॅक्सीविरोधात गुन्हा दाखल केला असून, यात फसवणुकीसह इतर कलमांमध्ये वाढ करण्यात आली आहे, तर कंपनीच्या आणखी दोन बड्या अधिकार्‍यांनाही आरोपी करण्यात आले आहे. ’आरटीओ’ने सोमवारी ’रॅपिडो’च्या विरोधात कलम 420, 505, 114 प्रमाणे कलमवाढ करण्यात आली आहे,तसेच रॅपिडो कंपनीच्या अधिकारी अरविंद सांका आणि शांतनु शर्मा या 2 अधिकार्‍यांचाही या गुन्ह्यात सोमवारी समावेश करण्यात आला आहे. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत रामराजे भोसले यांनी या संदर्भात फिर्याद दिली होती.

रॅपिडो बाईक टॅक्सी या ऑनलाइनरीत्या विनापरवाना सुरू करण्यात आल्या असून, हे अ‍ॅप कायदेशीर असल्याचे भासवून प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे. त्याचा आर्थिक फायदादेखील घेतला जात आहे. ही प्रवाशांची आणि आरटीओची फसवणूक आहे, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वी कंपनीचे अधिकारी जगदीश पाटील व अन्य अधिकारी यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात आता या गुन्ह्यातील कलमांमध्ये आणि कंपनीचे अधिकारी अरविंद सांका आणि शांतनु शर्मा यांच्या नावाचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहेत.

Back to top button