IPL Auction 2023 : भारतीय युवा क्रिकेटपटूंवर धनवर्षाव! | पुढारी

IPL Auction 2023 : भारतीय युवा क्रिकेटपटूंवर धनवर्षाव!

पुढारी ऑनलाईन डेस्क : टाटा आयपीएल 2023 (TATA IPL 2023) च्या सत्रासाठी मिनी लिलाव कोची येथे सुरुवात झाली आहे. यामध्ये 87 स्लॉटसाठी 405 खेळाडू आपले नशीब आजमावत आहेत. यापैकी 273 भारतीय खेळाडू आहेत. 10 संघांमधून सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडण्याची लढाई रंजक झाली आहे. बेन स्टोक्स, सॅम कुरेन, कॅमेरून ग्रीन, केन विल्यम्सन आणि जो रूट यांसारखे अनेक हाय-प्रोफाईल खेळाडू यावर्षी खेळाडूंच्या पूलमध्ये आहेत. क्रिकेटपटूंवर धनवर्षाव करणार्‍या या लिलावात यंदा कोण तुपाशी जेवणार आहे तर कोण उपाशी राहणार याबाबत चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे.

  • वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला दिल्ली कॅपिटल्सने 5.50 कोटींना विकत घेतले आहे. त्याची मूळ किंमत 20 लाख रुपये होती. म्हणजेच तो त्याच्या मूळ किमतीच्या 27.5 पटीने अधिक किमतीत विकला गेला. मुकेशचाही भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.
  • वेगवान गोलंदाज शिवम मावीला गुजरात टायटन्सने विकत घेतले. त्याची मूळ किंमत 40 लाख रुपये होती. गुजरातने त्याला त्याच्या मूळ किमतीच्या 15 पटीने विकत घेतले. जीटीने मावीला 6 कोटींना विकत घेतले.
  • वेगवान गोलंदाज वैभव अरोरा याला कोलकाता नाईट रायडर्सने 60 लाख रुपयांना विकत घेतले आहे. यापूर्वीही तो कोलकाता संघात होता.
  • विकेटकीपर फलंदाज केएस भरतला गुजरात टायटन्सने 1.20 कोटी रुपयांना विकत घेतले. दुसरा यष्टिरक्षक फलंदाज उपेंद्र यादवला सनरायझर्स हैदराबादने 25 लाख रुपयांना विकत घेतले. तर मोहम्मद अझरुद्दीन अनसोल्ड राहिला.
  • स्फोटक यष्टिरक्षक फलंदाज नारायण जगदीशनला कोलकाता नाईट रायडर्सने विकत घेतले. त्याची मूळ किंमत 20 लाख रुपये होती. केकेआरने त्याला 90 लाख रुपयांना खरेदी केले.
  • शशांक सिंग, सुमित कुमार आणि दिनेश बाना हे अनसोल्ड राहिले.
  • पंजाबचा अष्टपैलू खेळाडू सनवीर सिंगला सनरायझर्स हैदराबादने त्याची मूळ किंमत 20 लाखांमध्ये खरेदी केले. त्याने अलीकडच्या काळात देशांतर्गत स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तो आक्रमक फलंदाजी तसेच वेगवान गोलंदाजी करू शकतो. सनवीरकडे चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे आणि तो फलंदाजीदरम्यान षटकार आणि चौकारही मारतो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने तीन डावात 205.17 च्या स्ट्राइक रेटने 119 धावा केल्या. त्याला गोलंदाजीची फारशी संधी मिळाली नाही. सनवीरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये पाच सामन्यात सात विकेट्स घेतल्या आणि 156 धावा केल्या. सनवीरने उत्तराखंडविरुद्ध 84 धावांची खेळी केली होती.
  • समर्थ व्यासला सनरायझर्स हैदराबादने 20 लाख रुपयांना विकत घेतले.
  • जम्मू-काश्मीरचा अष्टपैलू खेळाडू विवरांत शर्मावर बोली लावण्यात आली. त्याची मूळ किंमत 20 लाख रुपये होती. तो डावखुरा फलंदाज आणि डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. तो मूळ किमतीच्या 13 पट अधिक किंमतीने विकला गेला. त्याला सनरायझर्स हैदराबादने 2.60 कोटी रुपयांना विकत घेतले. टी-20 मध्ये विवरांतने नऊ सामन्यांमध्ये 191 धावा केल्या आहेत आणि सहा विकेट्स घेतल्या आहेत.
  • अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत चॅम्पियन भारतीय संघाचा भाग असलेल्या शेख रशीदला चेन्नई सुपर किंग्जने 20 लाख रुपयांना विकत घेतले. शेख रशीद अंडर-19 चॅम्पियन भारतीय संघाचा उपकर्णधार होता.
  • प्रियम गर्ग, अनमोलप्रीत सिंग, एलआर चेतन, शुभम खजुरिया, रोहन कन्नुमल, हिम्मत सिंग हे अनसोल्ड राहिले.
  • भारताचा युवा लेग-स्पिनर मयंक मार्कंडेला सनरायझर्स हैदराबादने त्याची मूळ किंमत 50 लाख रुपयांना विकत घेतले.
  • जयदेव उनाडकटला लखनौ सुपरजायंट्सने 50 लाख रुपयांना विकत घेतले. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जे रिचर्डसनला मुंबईने दीड कोटी रुपयांना विकत घेतले.
  • इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रीस टोपलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने 1.6 कोटी रुपयांना विकत घेतले.
  • इंग्लंडच्या फिल सॉल्टला दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपयांना विकत घेतले.
  • हेनरिक क्लासेनला सनरायझर्स हैदराबादने 5.25 कोटींना विकत घेतले. दिल्ली कॅपिटल्सनेही यापूर्वी स्वारस्य दाखवले होते.

पूरनला लखनौने 16 कोटींना विकत घेतले

बांगलादेशच्या लिटन दासची मूळ किंमत 50 लाख होती तो अनसोल्ड राहिला. त्याच वेळी, वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरन, ज्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती, त्याला लखनऊ सुपर जायंट्सने 16 कोटी रुपयांना खरेदी केले. पूरनला मिळवण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्समध्ये बोलीचे युद्ध सुरू होते. पण राजस्थान रॉयल्सने 7.00 कोटीपर्यंत मजल मारल्यानंतर माघार घेतली. मात्र, यादरम्यान लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सने या खेळाडूला खरेदी करण्यात रस दाखवला. निकोल्सला लखनौ सुपर जायंट्सने 16 कोटी रुपयांना विकत घेतले.

बेन स्टोक्सला चेन्नई सुपर किंग्जने खरेदी केले

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला चेन्नई सुपर किंग्सने 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. स्टोक्स आयपीएल 2022 मध्ये खेळला नाही. स्टोक्सची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. चेन्नईलाही स्टोक्सच्या रूपाने कर्णधारपदाचा दावेदार मिळाला आहे. यासोबतच माजी अनुभवी अष्टपैलू ड्वेन ब्राव्होच्या जागाही भरून निघेल. ब्राव्होने यावर्षी आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांनी स्टोक्ससाठी प्रथम बोली लावली. नंतर आरआर आणि आरसीबी या दोघांनीही नाव मागे घेतले. यानंतर लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी बोलीमध्ये प्रवेश केला. शेवटी, चेन्नईने बोली युद्धात प्रवेश केला आणि स्टोक्सला 16.25 कोटी रुपयांना खरेदी करण्यात यश मिळविले.

मुंबईची कॅमेरून ग्रीनवर मोहोर

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. त्याला मुंबई इंडियन्सने 17.50 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. सॅम करननंतर तो आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. या लिलावात करणला पंजाबने 18.50 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याचबरोबर तो आयपीएल लिलावाच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडूही ठरला आहे. कॅमेरून ग्रीनने यावर्षी भारतीय दौऱ्यावर असलेल्या टी-20 मालिकेत अनेक तुफानी खेळी खेळल्या. तो भविष्यातील स्टार खेळाडू म्हणून गणला जात आहे.

होल्डरला राजस्थानने विकत घेतले

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरला राजस्थान रॉयल्सने 5.75 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. मागील मोसमात होल्डर लखनौकडून खेळला होता.

रझा आणि ओडियन देखील विकले

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ओडिअन स्मिथला गुजरात टायटन्सने त्याच्या मूळ किमतीत 50 लाख रुपयांना विकत घेतले. त्याचवेळी पंजाब किंग्जने झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझाला 50 लाखांना खरेदी केले.

सॅम कुरन ठरला IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू!

सॅम कुरनला पंजाब किंग्जने 18.50 कोटी रुपयांना विकत घेतले. इंग्लंडच्या या खेळाडूसाठी सर्व संघांमध्ये चुरशीची लढत सुरु होती. मुंबई, राजस्थान, पंजाब आणि चेन्नई या संघांनी बोली लावली. कुरनची बोली 12 कोटींच्या पुढे गेल्यानंतर चेन्नई शर्यतीत उतरले. यापूर्वी तो CSK संघाचा भाग होता.

सॅमची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. टी-20 विश्वचषकात तो टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. तसेच, अंतिम सामन्यात तो इंग्लंडचा सामनावीर ठरला. करण आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. याआधी केएल राहुल हा सर्वात महागडा खेळाडू होता. लखनऊमध्ये त्यांचा पगार 17 कोटी रुपये होता. याशिवाय तो लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. यापूर्वी, ख्रिस मॉरिसला 2021 मध्ये राजस्थानने 16.25 कोटींना खरेदी केले होते. कुरन हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडूही ठरला.

  • बांगला देशचा शकिब अल हसन अनसोल्ड राहिला त्याची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये होती.
  • मयंक अग्रवालला सनरायझर्स हैदराबादने ८.२५ कोटी रुपयांना विकत घेतले.
  • द. आफ्रिकेचा रिली रॉसौ अनसोल्ड राहिला. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.
  • इंग्लंडचा जो रूट अनसोल्ड राहिला. त्याची बेस प्राईज 1 कोटी रुपये होती.
  • अजिंक्य रहाणेला चेन्नई सुपर सुपरकिंग्सने त्याच्या मूळ किंमतीत म्हणजे 50 लाख रुपयांमध्ये विकत घेतले.

इंग्लंडचा हॅरी ब्रुक 13.25 कोटींमध्ये लिलाव

इंग्लंडचा हॅरी ब्रुकला सनरायझर्स हैदराबाद विकत घेण्यात यशस्वी ठरला. हॅरी ब्रूकची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये होती. मात्र लिलावात त्याला 13.25 कोटीं इतकी किंमत मिळाली. हॅरीला विकत घेण्यासाठी आरसीबी आणि राजस्थानमध्ये बोली सुरू असताना यात अचानक हैदराबादनेही उडी घेतली. हॅरीला आपल्या संघात सामील करून घेतले.

केन विल्यमसन गुजरात टायटन्सचा…

पहिल्यांदा केन विल्यमसनसाठी फक्त गुजरात टायटन्सने बोली लावली. विल्यमसनला गुजरातने त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये देऊन विकत घेतले आहे.

सनरायझर्स हैदराबाद 42.25 कोटी रुपयांच्या सर्वात मोठ्या पर्ससह मिनी लिलावात प्रवेश करेल, तर पंजाब किंग्ज 32.2 कोटी आणि लखनौ सुपर जायंट्स 23.35 कोटी रुपयांसह उरले आहेत. पर्सच्या बाबतीत हे दोघे अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर आहेत. दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सकडे फक्त 7.05 कोटी रुपये आहेत, तर रॉयल चॅलेंजर्सकडे 8.75 कोटी रुपये आहेत. (IPL Auction 2023)

आयपीएल मिनी लिलावाद्वारे संघटनांना त्यांच्या फ्रँचाईझीमध्ये काही नवीन चेहरे जोडण्याची संधी मिळते. इंग्लंड संघातील अनेक स्टार खेळाडू टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर फार्मात आले आहेत. यामध्ये हॅरी ब्रूकसारख्या युवा स्टारचा समावेश आहे. लिलावादरम्यान फ्रँचाईझींमध्ये तीव्र स्पर्धा होण्याची शक्यता आहे. (IPL Auction 2023)

Back to top button