नगर : विदेशी व अवैध मद्यसाठ्यावर कारवाई; 35 लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

नगर : विदेशी व अवैध मद्यसाठ्यावर कारवाई; 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

नगर; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाने 1 ते 20 डिसेंबर या कालावधीत विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत 35 लाख 13 हजार 275 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यसाठा जप्त करण्याबरोबरच अवैध मद्यावर कार्यवाही करून 117 गुन्हे दाखल करत 101 आरोपींना अटक केली असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी सांगितले. जामखेड येथील राजेवाडी फाटा बस स्थानकासमोर 20 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या कार्यवाहीत गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यसाठा व 1 वाहनांसह 6 लाख 30 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी अप्पासाहेब महादेव कुमटकर यांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 1 ते 20 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील अवैध मद्यावर कारवाई करण्यात येऊन 117 गुन्हे दाखल करीत, 101 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत देशी-विदेशी मद्य व 11 वाहनांसह 28 लाख 83 हजार 275 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, पुणे विभागीय आयुक्त अनिल चासकर व अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. निरीक्षक जी.टी.खोडे, दुय्यम निरीक्षक डी.आर.ठोकळ, आर.पी.दांगट, टी.बी.करंजुले, पी.डी.गदादे, ए.ए.कांबळे, डी.ए.खैरे, एस.ए.पवार व सुनंदा अकोलकर हे या मोहिमेत सहभागी झाले होते.

नाताळ व नववर्षाच्या कार्यक्रमावर नजर

नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्यार्क, हातभट्टी दारू, ताडी आदी निर्मिती व विक्रीवर कारवाईसाठी नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच अवैध मद्यविक्री होत असल्यास तत्काळ उत्पादन शुल्क विभागास माहिती द्यावी, असे आवाहन उत्पादन शुल्क अधीक्षक पाटील यांनी नागरिकांना केले आहे.

Back to top button