चाकण : बिबट्याचा महिलेवर हल्ला, गंभीर जखमी झालेली महिला बिबट्यासोबत घरातच अडकून पडली | पुढारी

चाकण : बिबट्याचा महिलेवर हल्ला, गंभीर जखमी झालेली महिला बिबट्यासोबत घरातच अडकून पडली

चाकण/महाळुंगे इंगळे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने जाणार्‍या भरधाव वाहनाची धडक बसल्याने सैरभैर झालेला बिबट्या नाणेकरवाडी, (ता. खेड) हद्दीतील आयएआय या कंपनीतील कामगारांच्या कॉलनीत घुसला. तेथील एका महिलेवर या बिबट्याने हल्ला केला. सदरचा प्रकार मंगळवारी (दि. 20) पहाटे अडीचच्या सुमारास घडला. बिबट्याच्या डरकाळ्यांमुळे कामगार कॉलनीत दहशतीचे वातावरण होते. कंपनीच्या अधिकार्‍यांनी वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू  टीमने सकाळी नऊच्या सुमारास  बिबट्यास जेरबंद केले.

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेस चाकण (ता. खेड) येथील खासगी रुग्णालयात उपचारीसाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत चाकण वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांनी सांगितले की, मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास नाशिक रस्त्याने जाणार्‍या मोटारीची बिबट्याला धडक बसली. त्यामुळे भेदरलेला बिबट्या रस्त्याच्या लगतच्या आयएआय कंपनीच्या कामगार कॉलनीत शिरला. तेथील एका महिलेवर त्याने हल्ला केला. अत्यंत अरुंद असलेल्या पत्र्याच्या कॉलनीत शिरलेल्या बिबट्याने तेथेच बसकण मारली. बिबट्याच्या डरकाळ्यांनी वसाहतीतील कामगार भयभीत झाले होते तसेच बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली महिलादेखील घरातच अडकून पडली.

कंपनीच्या अधिकार्‍यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर सकाळी आठच्या सुमारास वन परिक्षेत्र कार्यालय चाकणअंतर्गत बचाव पथक व माणिकडोह बिबटा निवारा केंद्र येथील रेस्क्यू टिम आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जुन्नर विभागाचे वन अधिकारी, चाकण वन परिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टिमने लपून बसलेल्या बिबट्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर त्याला सुरक्षितपणे पिंजर्‍यात जेरबंद करण्यात आले. बिबट्याला जेरबंद करण्यात आल्यानंतर जखमी महिलेला घरातून बाहेर काढून चाकण येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सदर बिबट्या साधारणत: 4 ते 5 वर्षे वयाचा असल्याचे तपासणीतून स्पष्ट झाल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. हा बिबट्या लगतच्या आळंदी फाटा भागातील वन हद्दीतून किंवा लगतच्या उसाच्या शेतीतून आला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, महामार्गावर बिबट्या नेमका कुठून आला याबाबत अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.  चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे, पोलिस निरीक्षक अनिल देवडे घटनास्थळी ठाण मांडून होते.

एमआयडीसीतील दुसरी घटना

चाकण औद्योगिक वसाहतीत बिबट्या शिरल्याची ही मागील वर्षभरातील दुसरी घटना आहे. यापूर्वी 21 मार्च 2022 रोजी मर्सिडीज बेंझ या बहुराष्ट्रीय कंपनीत बिबट्या शिरला होता. त्यानंतर आता नाणेकरवाडीतील आयएआय कंपनीत बिबट्या शिरल्याची घटना घडली.

Back to top button