पुणे : जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांकडून दावे-प्रतिदावे | पुढारी

पुणे : जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांकडून दावे-प्रतिदावे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय चिन्हावर लढवल्या गेल्या नसल्या तरी, स्थानिक राजकीय नेत्यांच्या पाठबळावरच जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांचा निकाल जाहीर होताच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी जिंकलेल्या ग्रामपंचायतींवर दावे-प्रतिदावे केले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून 131, भाजपकडून 63 जागांवर तर बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून तिसर्‍या क्रमांकाच्या ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला आहे. राज्यात सत्तातंर झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची झालेली ही मोठी निवडणूक होती. राज्यातील सत्तांतराचा जिल्ह्यात परिणाम होणार का, याबाबत अनेकांमध्ये उत्सुकता होती. मात्र, या निवडणुकीत स्थानिक पातळीवर अनेकरंगी लढत बघण्यास मिळाली.

अनेक ठिकाणी तर सर्व पक्षात मैत्रीपूर्ण लढती झाल्याचे एका पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने सांगितले. प्रत्यक्षात जनतेने पक्षीय कौलच दिला आहे, यात राजकीय पदाधिकार्‍यांशी बोलल्यावर त्यांनी दावे-प्रतिदावे केले. त्यानुसार जिल्ह्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांमध्ये चुरशीची लढत दिसली, तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने आम्ही तिसर्‍या क्रमांकावर असल्याचे सांगितले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी 131 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळविल्याचा दावा केला आहे. तर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी 63 ग्रामपंचायतींवर आमच्या विचारांचे सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप म्हणाले, आम्हाला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, आणखी काही निकाल हाती येणे बाकी आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख महेश पासलकर म्हणाले, की अजून काही तालुक्यांची माहिती घेणे बाकी आहे. निवडणुकीला सामोरे गेल्यानंतर कमी -अधिक प्रमाणात यश मिळाले आहे. ज्याठिकाणी आम्हाला यश मिळाले नाही, तिथे आम्ही चिंतन करणार आहोत. येणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या अगोदर चुकांमध्ये सुधारणा करून निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. काही ठिकाणी सर्व पक्ष वेगवेगळे तर काही ठिकाणी सर्वच पक्ष एकत्रितपणे स्थानिक आघाडीवर लढले आहेत. लोकांपर्यंत पोहोचण्यास कमी पडलो, त्यात येणार्‍या काळात सुधारणा करणार आहोत.

असे होते निवडणुकीचे चित्र…

जिल्ह्यातील 221 पैकी 45 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या, तर 176 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्यपदांच्या 1 हजार 62 जागांसाठी 3 हजार 313 उमेदवार रिंगणात होते, तर सरपंचपदांच्या 167 जागांसाठी 519 उमेदवार रिंगणात होते. सरपंचपदाच्या पाच तर सदस्यपदांच्या 79 जागांसाठी उमेदवारी अर्जच न आल्याने ही पदे रिक्त राहिली आहेत.

कोण काय म्हणाले ?

या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. 60 ते 70 टक्के ग्रामपंचायती या आमच्या विचारांच्या आल्या आहेत. टीमवर्कचा हा विजय आहे. स्थानिक पातळीवर राजकीय रंग या निवडणुकांना होताच. या निवडणुकीला महत्त्व होते. कारण, सत्तांतर झाल्यानंतरची ही निवडणूक आहे. सत्तांतराचा पुण्यामध्ये कुठलाही परिणाम झाला नाही, हे या निकालावरून स्पष्ट होते.
                                    – प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

 
आम्हीही निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. स्थानिक कार्यकर्त्यांची गावोगाव प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती, त्यामुळे चांगले यश आम्हाला मिळाले. अचूक नियोजनामुळे आम्हाला चांगली मुसंडी मारता आली. आमच्या विचारांचे सरपंच रिंगणात होते. 63 ग्रामपंचायती मिळाल्या, हे आम्हाला मिळालेले खूप मोठे यश आहे.
                                                         – गणेश भेगडे, जिल्हाध्यक्ष, भाजप.

 
आमचा पक्ष जिल्ह्यामध्ये तिसर्‍या क्रमांकावर राहिला आहे. चांगले यश मिळाले. सदस्य संख्या आमच्याकडे चांगल्या प्रमाणात आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आम्ही यापेक्षा अधिक चांगली मुसंडी निश्चित मारू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाला लोक पसंती देत आहेत.

             — रमेश कोंडे, जिल्हाप्रमुख, बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट)

Back to top button