Gram Panchayat Election Result : पुणे जिल्ह्यातील 176 ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल | पुढारी

Gram Panchayat Election Result : पुणे जिल्ह्यातील 176 ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 176 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज (मंगळवारी) सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासातच निवडणुकीचे निकाल लागतील. निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तालुका मुख्यालय आणि निवडणूक होणार्‍या गावांमध्ये पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात 80.79 टक्के मतदान झाले असून, दोन लाख 45 हजार 186 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यामध्ये एक लाख 18 हजार 244 महिला, तर एक लाख 26 हजार 929 महिला मतदारांचा समावेश आहे. प्रत्येक तालुक्याची मतमोजणी तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी होणार आहे. सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष सुरुवात होणार असली, तरी टप्प्याटप्प्याने मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.

सरपंचपदाची निवड थेट जनतेमधून होत आहे. मात्र, जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी कोणीही अर्ज न भरल्याने हे पद रिक्त राहिले आहे. जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतींपैकी 45 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या, तर 176 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्यपदाच्या 1 हजार 62 जागांसाठी तब्बल 3 हजार 313 उमेदवार रिंगणात होते, तर सरपंचपदाच्या 167 जागांसाठी 519 उमेदवार रिंगणात होते. बहुतेक गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरस पाहायला मिळाली, तर दुसरीकडे सदस्यपदाच्या 79 जागांसाठी उमेदवारी अर्जच न आल्याने हे पद रिक्त राहिले आहे.

Back to top button