कर्नाटकी पोलिसांची दडपशाही; आमदार हसन मुश्रीफांसह मविआच्या कार्यकर्त्यांना सीमेवर रोखले | पुढारी

कर्नाटकी पोलिसांची दडपशाही; आमदार हसन मुश्रीफांसह मविआच्या कार्यकर्त्यांना सीमेवर रोखले

कागल; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव येथे मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला परवानगी नाकारली. यासाठी उभारण्यात आलेला मंडपही मोडण्यात आला. याचा निषेध करत आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक राज्यात मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि पदाधिकारी यांच्यामध्ये झटापट झाली. या झटापटीत आमदार मुश्रीफ यांच्यावर लाठीहल्ल्याचा प्रयत्न कानडी पोलिसांनी केला. यावेळी बेळगाव, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आज सकाळी साडेदहाच्या सुमारास कागल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एकत्र आले. यावेळी त्यांनी कर्नाटकात जाण्याचा निश्चय केला. नवीन टोल नाका येथून एक किलोमीटर अंतर चालत जाऊन महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील दूधगंगा नदी येथे कर्नाटक राज्यात घुसण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. कर्नाटक पोलिसांनी अडथळे निर्माण करून कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये जोरदार झटापट झाली. कार्यकर्त्यांनी कर्नाटक पोलिसांकडून लाटी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल निषेध केला.

सीमेवर दोन्ही राज्यांच्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. २०० हून अधिक पोलिसांनी कर्नाटक राज्याची सीमा रोखून धरली होती. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि संजय पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन पुन्हा पुन्हा कर्नाटक पोलिसांचे कडे तोडून कर्नाटक राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन काही वेळाने सोडून दिले.

हेही वाचा :

Back to top button