पिंपरी : खबरदार! शासनाकडे तक्रार केल्यास.. | पुढारी

पिंपरी : खबरदार! शासनाकडे तक्रार केल्यास..

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी पालिकेसंबंधित विषयाबाबत थेट महाराष्ट्र राज्य शासनाकडे तक्रार करतात. असा प्रकार थेट शासनाकडे तक्रार करू नये. तसे केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशी तंबी पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.

अनेक महिला अधिकार्‍यांची शासनाकडे धाव

पालिकेचे काही अधिकारी व कर्मचारी प्रशासनाकडून काहीच कारवाई न झाल्यास किंवा त्यांच दखल न घेतली गेल्यास राज्य शासनाचे मंत्री व अधिकार्‍यांकडे तक्रार करतात. त्यानंतर त्या तक्रारीची दखल घेतली जाते, असा त्यांचा अनुभव आहे. तसेच, महिला अधिकारी व कर्मचार्‍यांच्या लैगिंक व मानसिक छळसंदर्भातील तक्रारींवर काहीच कारवाई होत नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे न्याय मिळावा म्हणून थेट शासनाकडे तक्रार केली जाते. मात्र, त्या प्रकारे तक्रार करण्यास आयुक्त सिंह यांनी अटकाव केला आहे. राज्य शासनाकडे थेट तक्रार केल्यास कारवाई केली जाईल, अशी तंबी त्यांनी दिली आहे.

विभाग प्रमुखांकडे तक्रार करण्याचे आवाहन

अधिकारी व कर्मचार्‍यांनी वैयक्तिक तक्रारी, पदोन्नती, बदल्या, सेवानियमात बदल, पदोन्नती निकषात बदल आणि अन्य प्रकाराच्या तक्रारी संबंधित विभागप्रमुख किंवा वरिष्ठ अधिकार्‍यांकडे करणे अभिप्रेत आहे. त्या तक्रारी विभागप्रमुख, नियंत्रण अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकार्‍यांकडे सादर कराव्यात. तसे न केल्यास प्रशासनाला वेठीस धरणार्‍या अशा अधिकारी व कर्मचार्‍यांची कृती गंभीर स्वरूपाची ग्राह्य धरून महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 मधील नियम 3 चे उल्लंघन करणारी ठरेल. त्या गैरवर्तणुकीबाबत संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. हे म्हणजे अधिकारी व कर्मचार्‍यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार असल्याचा आरोप करीत त्या आदेशावरून पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.

 

Back to top button