नितीन गडकरी यांनी मुंबई- नाशिक कारने प्रवास करावा : छगन भुजबळ यांचा टोला | पुढारी

नितीन गडकरी यांनी मुंबई- नाशिक कारने प्रवास करावा : छगन भुजबळ यांचा टोला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नाशिकला येत असतील, तर चांगलेच आहे. त्यांनी केवळ मुंबई-नाशिक प्रवास कारने करावा. ना. गडकरी यांना कामाच्या व्यापामुळे रस्त्याने येणे शक्य नसेल, तर त्यांनी हेलिकॉप्टरमधून जाताना रस्त्याची अवस्था पाहावी, असा मार्मिक टोला माजी मंत्री छगन भुजबळ यांनी ना. गडकरींना लगावला आहे.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी नाशिक – मुंबई रस्त्याच्या दुरवस्थेवरून केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. भुजबळ म्हणाले की, नाशिक – मुंबई रस्त्याच्या दुरवस्थेवरून अनेकांनी आवाज उठवला. मात्र, परिस्थिती जैसे थे आहे. आता तर नाशिक – मुंबई महामार्ग वाहन चालवण्यायोग्य राहिलेला नाही. यूपीए सरकारच्या काळात जेव्हा नाशिक – मुंबई महामार्गाचा निर्णय घेण्यात आला होता, त्यावेळी पुढील काही वर्षांत दोन्ही बाजूने एक-एक लेन वाढविण्यात येईल, नंतर वेळोवेळी डागडुजी होईल, असा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे नाशिक – मुंबई रस्त्याची पूर्णपणे वाट लागली असून, सहा तासांत नाशिक गाठणे अशक्य होत आहे.

काही दिवसांपूर्वी नाशिक – मुंबई काँक्रिटीकरण करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. ही बाब चांगली असली, तरी जोपर्यंत काँक्रिटीकरणाबाबत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत रस्ता सुस्थितीत कसा राहील, याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचेही भुजबळ यांनी म्हटले.

राज्यात अघोषित अणीबाणी

१७ डिसेंबरच्या महामाेर्चाला परवानगी दिलीच पाहिजे. याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे. ज्या पद्धतीने राज्यात राजकारण केले जात आहे, त्यावरून राज्यात अघोषित अणिबाणी असल्याचे वाटते. एकतर गृहमंत्र्यांनी परवानगी देऊ नये असे सांगितले असेल किंवा पोलिस परवानगी देत नसतील, तर त्यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही भुजबळ यांनी केली.

…म्हणूनच सोमय्यांना क्लीन चिट

भाजप नेते किरीट सोमय्या यांना आयएनएस विक्रांत प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने क्लीनचिट दिली असल्याबाबत भुजबळांना विचारले असता, याबाबत फारशी माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सरकार त्यांचेच आहे, त्यामुळे क्लीनचिट दिली असेल, असा खोचक टोलाही भुजबळ यांनी लगावला.

हेही वाचा :

Back to top button