Raghuram Rajan :देशात पुढची क्रांती होणार सेवा क्षेत्रात; रघुराम राजन यांचे भारत जोडो यात्रेत भाकीत

Raghuram Rajan
Raghuram Rajan

जयपूर : वृत्तसंस्था : पुढची क्रांती देशातील सेवा क्षेत्रात होऊ शकते, असे भाकीत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर तसेच अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी वर्तवले. जगभरातील विविध आघाडीच्या अर्थव्यवस्थांवर मंदीचे सावट असताना राजन (Raghuram Rajan) यांचे हे भाष्य महत्त्वाचे मानले जाते. राजन हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.

राहुल गांधी यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान, देशात नवीन प्रकारची हरितक्रांती घडत असून हवामान बदलाचे आव्हान लक्षात घेत पवनचक्की उभारणे आणि पर्यावरण पूरक इमारती उभारणे या क्षेत्रात भारत अग्रसर होऊ शकतो, असेही राजन यांनी सांगितले. भारतासाठीच नव्हे तर अवघ्या जगासाठी पुढील वर्ष अधिक आव्हानात्मक असेल, असा इशाराही राजन यांनी दिला. देशाच्या आर्थिक विकासासाठी अनेक प्रकारे सुधारणा कराव्या लागतील. निम्न मध्यमवर्गीयांना केंद्रस्थानी मानून काही धोरणे आखणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजन हे बुधवारीच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करताना देशासमोरील आर्थिक आव्हानांचा आढावा त्यांनी घेतला. कोरोना महामारीच्या काळात मध्यमवर्ग, निम्न मध्यमवर्गाला मोठा फटका बसला. त्यामुळे या वर्गाला डोळ्यांसमोर ठेवून धोरण आखणे गरजेचे आहे. लघु उद्योग आणि मध्यम आकाराच्या उद्योगांसाठी अनुकूल वातावरण तयार करण्याची गरज तसेच हरित ऊर्जा वापरावरही राजन यांनी भर दिला.

कोरोनाच्या काळात घरून काम करत असल्याने उच्च मध्यमवर्गीयांचे उत्पन्न वाढले. परंतु कारखान्यांमध्ये काम करणाऱ्यांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला होता. महामारीच्या काळात आर्थिक विषमता वाढल्याचे त्यांनी सांगितले. देशातून होणारी निर्यात थोडी का होईना रोडावली आहे. महागाईचा अडथळा आहे. बेरोजगारी वाढत असून आता खासगी क्षेत्राने नोकऱ्या देण्यासाठी पुढे यायला हवे, अशी अपेक्षा राजन यांनी व्यक्त केली.

Raghuram Rajan : निम्नमध्यम वर्गाकडे लक्ष द्यावे

कोरोना महामारीमुळे श्रीमंतांना कोणतीही आर्थिक अडचण जाणवली नाही. गरीब वर्गाला रेशन आणि इतर गोष्टींची मदत मिळाली. पण, निम्न मध्यमवर्गाला मात्र मोठा फटका बसला. म्हणूनच सरकारने निम्न मध्यमवर्गीयांकडे लक्ष देण्याची सध्या सर्वाधिक गरज आहे, असेही राजन यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news