पिंपरी : कुठेही टाकला जातोय घातक कचरा | पुढारी

पिंपरी : कुठेही टाकला जातोय घातक कचरा

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : शहराचे सौंदर्य अबाधित रहावे, स्वच्छतेला हातभार लागावा आणि कचर्‍याची विल्हेवाट लावणे सोपे जावे यासाठी कचर्‍याचे विलगीकरण तसेच वर्गीकरण करण्यात येते. यामध्ये सॅनिटरी, घरगुती बायोमेडिकल कचरा मात्र सुक्या कचर्‍यामध्येच टाकला जात आहे. यामुळे कचरावेचकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या आधीपासूनच कचर्‍याचे ओला आणि सुका कचरा अशा दोन प्रकारांत विलगीकरण केले जाते. त्यानंतर आता ओला, सुका तसेच प्लास्टिक ई वेस्ट आणि सॅनिटरी वेस्ट अशा चार प्रकारांत कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात येते. यामध्ये सुक्या कचर्‍याबरोबर मोठ्या प्रमाणात सॅनिटरी पॅडचा कचरा असतो.

सॅनिटरी पॅडमध्ये प्लास्टिकचा वापर केला असल्याने त्याचे विघटन लवकर होत नाही. हा कचरा वेगळा टाकण्यासाठी घंटागाडीच्या खाली एक सॅनिटरी पॅड टाकण्यासाठी बॉक्स बसविण्यात आला आहे. मात्र, बर्‍याचदा हा बॉक्स रिकामाच असतो. घराघरांतून आलेल्या कचर्‍यात सॅनिटरी पॅडदेखील सुक्या कचर्‍याबरोबर एकत्र टाकले जातात.

तसेच घरामध्ये आजारी व्यक्तींना देण्यात येणारी औषधे, इंजेक्शन, त्यांच्या बॉटल्स यादेखील सुक्या कचर्‍यात टाकल्या जातात. यामुळे कचरा वेचकांच्या जीवास धोका उद्भवतो. घंटागाडीत सर्व प्रकारचा कचरा एकत्रितच करून तो खत प्रकल्पावर नेला जातो. त्यामुळे त्याठिकाणी कचरा अलगीकरण करण्यात अडचणी येतात.

मशीनचे प्रयोग निरूपयोगी
सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी सॅनिटरी वेंडिंग मशीन देखील बसविले होते. मात्र, काही काळानंतर हा प्रयोगदेखील निरूपयोगी झालेला दिसत आहे. बहुतांश ठिकाणी या मशीन बंद स्थितीत आहेत. त्यामुळे हे पॅड कचर्‍यातच टाकावे लागतात.

सॅनिटरी कचर्‍यासाठी असावी खूण
महिला सॅनिटरी पॅड व डायपर्स सुक्या कचर्‍यातच टाकत आहेत. त्यामुळे कचर्‍याचे वर्गीकरण करताना अवघड होते. तसेच पॅड व डायपर्ससारख्या कचर्‍यासाठी महिलांनी काहीतरी खूण करावी म्हणजे आम्ही ते काळजीपूर्वक हाताळू, असे कचरा वेचकांनी सांगितले.

रेड डॉट मोहीम नाही
सॅनिटरी कचरा ओळखता यावा यासाठी रेड डॉट मोहीमदेखील राबविली जाते. पिंपरी चिंचवड शहरात मात्र, अद्याप अशी मोहीम राबविली गेलेली नाही. त्यामुळे महिला व तरुणी यामध्ये जनजागृती नसल्याने कागद, प्लास्टिक पिशव्यांमध्ये खूण न करता पॅड टाकले जातात.

कचर्‍याच्या चार प्रकारानुसार नागरिकांनी वर्गीकरण करून कचरा द्यायला पाहिजे. यासाठी घंटागाडीला सॅनिटरी बॉक्सदेखील बसविण्यात आला आहे. तसेच कर्मचार्‍यांना सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. यावर आम्ही कर्मचार्‍यांची अजून एक बैठक बोलावून जनजागृतीविषयी सूचना देणार आहोत.
                                                           -अजय चारठाणकर,
                                                उपआयुक्त, आरोग्य विभाग, पिं.चिं.मनपा

 

Back to top button