Bhagat Singh Koshyari : ‘त्या’ विधानावर राज्यपालांचा अमित शहांकडे पत्राद्वारे खुलासा | पुढारी

Bhagat Singh Koshyari : 'त्या' विधानावर राज्यपालांचा अमित शहांकडे पत्राद्वारे खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  (Bhagat Singh Koshyari) यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे सर्वत्र संतप्त पडसाद उमटले. खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यपालांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. तर संसदेतही महाविकास आघाडीच्या खासदारांनी मुद्दा उपस्थित केला होता. राज्यपालांना हटविण्याची मागणी जोर धरू लागली असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा विचारही करू शकत नसल्याचे म्हटलं आहे.

राज्यपाल कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी पत्रात लिहीले आहे की, माझ्या भाषणातील एक छोटा अंश काढून काही लोकांनी त्याचा विपर्यास केला. आम्ही शाळेत होतो, तेव्हा महात्मा गांधीजी, पंडित नेहरुजी, नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादींना काही विद्यार्थी आदर्श मानून उत्तर देत होते. सध्याच्या युवापिढीचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून सध्याचे नेते नितीन गडकरी हेही आदर्श असू शकतात. तसेच डॉ. एपीजे अब्दुल कलाम, होमी भाभा यांच्या सारखे अनेक कर्तव्यशील व्यक्ती युवा पिढीचे आदर्श असू शकतात. आज संपूर्ण जगात भारताचा लौकिक वाढविणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा आदर्श विद्यार्थ्यांसमोर राहू शकतो, याचा अर्थ महापुरुषांचा अवमान करणे, असा तर होत नाही. येथे कुठेही तुलना करणे हा विषयच असू शकत नाही, असे राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे आदर्श आहेत. कोरोनाच्या काळात अनेकजण आपल्या घरातून बाहेर निघत नव्हते. तेव्हा मी या वयात सुद्धा शिवनेरी, सिंहगड, रायगड, प्रतापगडासारख्या पवित्र स्थळांवर पायी जाऊन दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शूर पुत्राला जन्म देणार्‍या वंदनीय माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थळी सिंदखेडराजा येथेही गेलो. गेल्या ३० वर्षांत त्याठिकाणी जाणारा मी पहिला राज्यपाल असेन. तेथे मी हवाई मार्गाने नाही, तर मोटारीने गेलो. छत्रपती शिवाजी महाराज हे सदासर्वकाळासाठी प्रेरणास्त्रोत आहेत, असेही राज्यपालांनी म्हटले आहे.

२०१९ पासून कोणतीही निवडणूक लढणार नाही किंवा राजकीय पदांपासून दूर राहीन, अशी माझी इच्छा प्रदर्शित केली होती. परंतु पंतप्रधान आणि आपल्यासारख्यांचा माझ्यावरील स्नेह आणि विश्वास पाहून मी महाराष्ट्रासारख्या महान राज्याचे राज्यपालपद स्वीकारले. माझ्याकडून कधी अनावधानाने चूक झालीच, तर तत्काळ खेद व्यक्त करणे किंवा क्षमायाचना करण्यास मी कधीच संकोच करीत नाही. मुघल काळात साहस, त्याग आणि बलिदानाचे मूर्तिमंत असलेल्या महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंहजी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या वंदनीय महापुरुषांबाबत अपमानाची तर मी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही, असा खुलासा राज्यपालांनी केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button