नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल करण्यात आलेल्या वक्तव्याचे पडसाद संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उमटले. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावेळी महाविकास आघाडीच्या खासदारांनी 'राज्यपाल हटाओ'ची घोषणाबाजी केली. पीठासीन अधिकाऱ्यांनी हा मुद्दा मांडण्यासाठी मुद्दाम कमी वेळ दिल्याचा आरोप राऊत यांनी केला.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्याप्रकारे अवमान केला जात आहे, या विषयावर उशिरा का होईना मुद्दा मांडण्याची संधी दिल्याने राऊत यांनी लोकसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यांचे आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचेच नाही. तर देशाचे आदर्श आहेत. देशाचा सन्मान आहेत. परंतु, घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तींकडून महाराजांचा सातत्याने अवमान केला जात आहे, असा मुद्दा राऊत यांनी उपस्थित केला. या वेळी इतर खासदारांनी राज्यपालांना हटवण्याची मागणी केली. ( Bhagat Singh Koshyari )
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सातत्याने केली जाणारी अवमानजनक वक्तव्यांचा मुद्दा उपस्थित केला. मराठीत मुद्दा मांडताना कोल्हे म्हणाले, शिवाजी महाराज देशाचे आदर्श आहेत. शिवभक्तांसाठी छत्रपती शिवाजी महाराज देवापेक्षाही कमी नाहीत. असे असताना सातत्याने महाराजांचा अपमान करणारी वक्तव्य केली जात आहेत. यासाठी कायदेशीर तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली. कोल्हे यांचा मुद्दा पूर्ण होण्यापूर्वीच पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी लोकसभेचे कामकाज दाेन वाजेपर्यंत तहकूब केले. यावेळी खासदारांनी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशी घोषणाबाजी केली.
हेही वाचा :