नवी दिल्ली, ९ डिसेंबर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचीच नाही तर देशाची अस्मिता आहे. शिवरायांबद्दल त्यामुळे प्रत्येकाने विचारपूर्वक विधान करावे. सध्या राज्यपाल पदावर भगतसिंग कोश्यारी आहेत. देशात जसे राष्ट्रपती हे पद मोठे असते. तसेच, राज्यात राज्यापाल हे पद फार मोठे असते.या पदावर असताना त्यांनी शिवरायांबद्दल असे विधान करणे अपमानास्पद आहे.त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा निघणे गरजेचे आहे,असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी व्यक्त केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांसोबत झालेल्या या बैठकीत भाजपचे खासदार उपस्थित होते.
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा होणारा अपमान पाहता काही शिवभक्त एकत्र येत आहेत. मविआच्या आंदोलनाकडे राजकीय दृष्टीकोनातून बघणे चुकीचे आहे. हा विषय कोणत्या एका पक्षाचा नाही. पंरतु, सातत्याने शिवरायांचा होत असलेल्या अपमानामुळे महाराष्ट्रातील आणि देशातील शिवभक्त नाराज आहेत. शिवरायांचा वारंवार होणाऱ्या अपमानावरून हे महाराष्ट्रात चालते असे वाटायला नको. त्यामुळे याला कुठेतरी रोखले पाहिजे. याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.