संगमनेर : कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्या | पुढारी

संगमनेर : कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्या

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  भुकेने व्याकुळ झालेला बिबट्या भक्षाच्या शोधात असताना त्याला कोंबड्यांचे खुराडे दिसले आणि त्याने शिकार मिळाल्याच्या आनंदात खुराड्यात प्रवेश केला. मात्र शिकार करण्याच्या नादात शिकारी बिबट्याच खुराड्यात जेरबंद झाल्याची घटना संगमनेरच्या पठार भागात घडली. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील सारोळे पठार येथील घनश्याम भागाजी फटांगरे यांची शेतात वस्ती असून त्यांनी वस्तीवर कोंबड्या ठेवण्यासाठी लोखंडी जाळीचे दणकट खुराडे ठेवलेले आहे.

या खुराड्यात बुधवारी रात्री भुकेने व्याकूळ झालेला बिबट्या भक्षाच्या शोधात या कोंबड्यांच्या खुराड्यात घुसला आणि अलगद या खुराड्यातच अडकला. याबाबतची माहिती संगमनेरच्या वनविभागाला देण्यात आल्यावर वनविभागाचे चैतन्य कासार आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सारोळे पठार येथे जात खुराड्यात जेरबंद झालेला बिबट्या ताब्यात घेतले.

Back to top button