पुणे : मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या दोघांना पकडले | पुढारी

पुणे : मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या दोघांना पकडले

पुणे : मेफेड्रोन (एम.डी) विक्रीसाठी आलेल्या दोघांना कोथरुड पोलिसांनी महात्मा सोसायटी रोड परिसरातून ताब्यात घेतले. रवि मोहनसिंग राठोड उर्फ बिल्ला (वय.36,रा. भुगाव मुळशी, मूळ कोटा,राजस्थान), आदित्य संदीप मान (वय.23,रा.बावधन, मूळ.सिडको नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक लाख रुपये किंमतीचे सहा ग्रॅम 750 मिली ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन, 3 मोबाईल आणि बुलेट असा 1 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी दोघांच्या विरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिल्ला याला अमली पदार्थाचे व्यसन आहे. तो शहरात अमली पदार्थाची विक्री करतो. तर आदित्य हा अमली पदार्थाची मुंबई येथून खरेदी करून पुण्यात विक्री करतो. तो दाखविण्यासाठी बांधकाम क्षेत्रात काम करत असल्याचे सांगतो.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ तस्करीच्या अनुषंगाने गस्तीवर असताना, पोलिसांना बातमी मिळाली होती की, महात्मा सोसायटी रोड परिसरातील एका सोसायटीच्या समोर दोन व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी करून अंगझडती घेतली असता, एमडी हा अमली पदार्थ मिळून आला. त्यांनी तो पुण्यातील तरुणांना विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.

ही कामगिरी पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे निरीक्षक बाळासाहेब बडे, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पी.व्ही. कुलकर्णी कर्मचारी अधिनाथ चौधर, योगेश सुळ, संजय दहिभाते, विष्णू राठोड, अजय शिर्के,शरद राऊत,दादा भवर, मंगेश शेळके यांच्या पथकाने केली.

Back to top button