FIFA WC Spain : फुटबॉल विश्वचषकानंतर स्पेनच्या प्रशिक्षकांची उचलबांगडी | पुढारी

FIFA WC Spain : फुटबॉल विश्वचषकानंतर स्पेनच्या प्रशिक्षकांची उचलबांगडी

पुढारी ऑनलाईन डेस्क : २०१० सालच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेला स्पेनला संघ यंदाच्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित करू शकला नाही. त्यांना मोरोक्कोने पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत करत धक्का दिला. यानंतर स्पेनला आता आणखी एक धक्का बसला आहे. रॉयल स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनने सध्याचे प्रशिक्षक लुईस एनरिक यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे. तसेच त्यांच्या जागी स्पेनच्या २१ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक लुईस डे ला फुएंटे यांना स्पेनच्या फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा देण्यात आली. (FIFA WC Spain)

स्पेनने फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील ग्रुप स्टेजमधील सामन्यात कोस्टा रिकाचा ७-० असा धुव्वा उडवत स्पर्धेला शानदार पध्दतीने सुरुवात केली. तथापि, जर्मनीविरुद्ध अनिर्णित आणि नंतर जपानकडून २-१ अशा फरकाने पराभव पत्करूनही संघ राऊंड ऑफ १६ फेरीसाठी पात्र ठरला होता. राऊंड ऑफ १६ सामन्यात स्पेनचा सामना मोरोक्कोशी झाला. या सामन्यात स्पेन विजयी होणार असे वाटत होते. परंतु संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांना गोल न करता आल्यामुळे सामना एक्स्ट्रा टाईममध्ये खेळवण्यात आला. यामध्ये ही सामन्याचा निकाल न लागल्यामुळे सामन्याच्या निकाल पेनल्टी शुट आऊटवर घेण्याचा निर्णय रेफरींनी घेतला. पेनल्टी शुटआऊटमध्ये मोरोक्कोच्या गोलकीपरने केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे स्पेनला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

RFEF (रॉयल स्पॅनिश फुटबॉल फेडरेशन) ने एका निवेदनात म्हटले आहे की, अध्यक्ष लुईस रुबियालेस आणि क्रीडा संचालक, जोस फ्रान्सिस्को मोलिना या दोघांनीही लुईस एनरिक यांना आपला निर्णय कळविला आहे. त्यांनी सांगितले की, त्यांना लुईस एनरिक आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचे त्यांनी केलेल्या कामाबद्दल आभार मानायचे आहेत. यानंतर RFEFने जाहीर केले की, मागील वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये स्पेनच्या पुरुष संघाचे नेतृत्व करणाऱ्या लुईस डे ला फुएंटे यांना स्पेन फुटबॉल संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

हेही वाचा;

Back to top button