नगर : प्रशासनाला गुरुजींनी शिकविलेे नियमांचे धडे | पुढारी

नगर : प्रशासनाला गुरुजींनी शिकविलेे नियमांचे धडे

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात 203 ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली आहे. मात्र या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर कर्मचारी नेमणूका करताना काही तालुक्यांत सावळा गोेंधळ झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळेच शिक्षकांनी लेखी निवेदनातून राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचेच आता प्रशासनाला धडे दिले आहेत.त्यामुळे आता तरी तहसीलदार हे चुकीच्या नेमणुका रद्द करतील, असा विश्वास शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्यासह राजेंद्र निमसे आदींनी व्यक्त केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान केंद्राध्यक्ष म्हणून प्राथमिक शिक्षकांची नेमणूक केलेली आहे.

वास्तविक पाहता राज्य निवडणूक आयोगाचे दि. 27 जानेवारी 1995 च्या निर्देशानुसार ज्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थाचे अधिकारी व कर्मचारी हे मतदान केंद्रावर नेमले जातील, त्यावेळी मतदान केंद्राध्यक्ष व पहिला मतदान अधिकारी हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी, कर्मचारी असू नयेत. तसेच मतदान केंद्राध्यक्ष हे मतदान केंद्रावरील वरिष्ठ प्रमुख अधिकारी असल्याने त्यांची जवाबदारी सर्वाधिक आहे. त्यामुळे हा अधिकारी शक्यतो राजपत्रित अधिकारी असावा, मात्र उपलब्धतेनुसार राजपत्रित अधिकारी उपलब्ध न झाल वरिष्ठ दर्जाचा, पर्यवेक्षकीय काम पाहणारा अधिकारी असावा, म्हणून मतदान केंद्राध्यक्ष म्हणून नेमणूक केलेले आदेश हे प्राथमिक शिक्षकांचे (वर्ग-3) रद्द करण्यात यावेत,अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात दिव्यांग कर्मचारी यांची नेमणूक रद्द करण्यात यावी, गंभीर आजारी व 50 वयोगट असलेल्या महिला कर्मचारी यांचे आदेश रद्द व्हावेत, निवडणूक असलेल्या गावातील प्रत्यक्ष मतदार असणार्‍या कर्मचार्‍यांचे आदेश रद्द करण्यात यावे, मतदानाच्या हक्कापासून त्यांना वंचित ठेवू नये, काही शाळांमध्ये 100 टक्के शिक्षकांना नेमणूका दिलेल्या आहेत. संबंधित शाळेमध्ये किमान 50 टक्के शिक्षक शाळेमध्ये ठेवण्यात यावेत, जेणेकरून संबंधित शाळा पूर्ण क्षमतेने चालू राहिल, अशी मागणी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, राजेंद्र निमसे, दत्ता कुलट, नितीन पंडीत, किशोर शिंदे, राहुल सूर्यवंशी,सुभाष काळे, आबासाहेब ठाणगे, जे.बी. काळे, विजय शिंदे, बी.बी. पवार यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

दिव्यांगांनाही नेमणुका, शाळाही बंद ठेवणार का?

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासनाने मतदान केंद्रावर गुरुजींच्या नेमणुका केल्या आहेत. मात्र ह्या नेमणुका करताना नियमांत नसतानाही दिव्यांगांना डयुटी लावली आहे. काही शिक्षक सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. अशा ज्येष्ठ शिक्षकांनाही निवडणुकीत ढकलले आहे. काही तालुक्यांत माध्यमिक, काही ठिकाणी प्राथमिक शिक्षकांना नेमणुका दिल्या आहेत. काही शाळेत दोनच शिक्षक, त्या दोन्ही शिक्षकांनाही नेमणूक आहे. त्यामुळे प्रशासनाला नेमके काय साध्य करायचे आहे, यावरही गुरुजींनी बोट ठेवले आहे. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांनी नगर तालुक्यासह अन्य ठिकाणची पडताळणी करून चुकीच्या नेमणुका रद्द कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 

Back to top button