जवळा : अन् ’पेल्या’चे आले ’टोल्या’वर..! घोटभर दारूवरून जवळ्यातील पुढार्‍यांच्या दोन गटांत हाणामारी | पुढारी

जवळा : अन् ’पेल्या’चे आले ’टोल्या’वर..! घोटभर दारूवरून जवळ्यातील पुढार्‍यांच्या दोन गटांत हाणामारी

जवळा : पुढारी वृत्तसेवा : पारेनर तालुक्यातील जवळा येथील राजकीय गाव पुढार्‍यांमध्ये घोटभर दारूवरून ढाब्यावर तुफान राडा झाल्याने त्याची गावात जोरदार चर्चा सुरू आहे. ’पेल्या’चा वाद थेट ’टोल्या’वर आल्याने त्यावर खमंग चर्चा झडताना दिसत आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, जवळ्यातील काही आजी-माजी पदाधिकारी जवळ्यातील एका धाब्यावर अवैधरित्या मद्याअमृत प्राशन करत बसले होते. काही काळानंतर तिथे गावातीलच एका तरूण स्वयंघोषित प्रतिष्ठित विद्यमान पदाधिकार्‍याचे आगमन झाले.

त्यावेळी त्यातील काही पदाधिकारी यांनी त्यांना पंगतीत सामील होण्याची ऑफर दिली. सदर पंगतीला त्यांच्यात मतभेद असणारा एक माजी पदाधिकारी बसलेला होता. त्याने त्या प्रतिष्ठित पदाधिकार्‍याला आपली मौल्यवान दारू देण्यास नकार दिला व उरलेली दारू बाटलीत भरून खिशात घातली. हे पाहून हा प्रतिष्ठित पदाधिकारी संतापला व गलिच्छ भाषेत शिवीगाळ करू लागला.

पेल्याची बात आता टोल्यावर येऊ लागताच, ही खबर त्यातल्या एका सूज्ञ मद्यपिने शिवीगाळ झालेल्या पदाधिकार्‍यांच्या घरी दिली. त्यानंतर त्या पदाधिकार्‍याच्या घरच्या महिला मंडळाने विद्यमान पदाधिकार्‍याच्या घरी जाऊन त्याची जोरदार धुलाई केल्याची जोरदार चर्चा गावात रंगली आहे. घोटभर (पेलाभर) दारूवरून झालेल्या या वादाची जवळ्यात दोन दिवसांपासून खमंग चर्चा झडताना दिसत आहे. तर, यावरून मार खाल्लेला ’तो’ पदाधिकारी मात्र ’ तो मी नव्हेच’ अशा आविर्भावात गावात सध्या फिरत आहेत.

ग्रामस्थ मात्र याची मोठ्या चवीने चर्चा चाखत आहेत. तर, त्यांच्या जवळचे काहीजण ’झाकली मूठ सव्वा लाखाची’ म्हणत मूग गिळून गप्प आहेत. एकूनच घोटभर दारुपायी या थराला जाणारे पुढारी गावगाड्याच्या विकासातही अशाच प्रकारे चांगल्या कामांना खोडा घालताना दिसून येतात. धन्य ते गाव ..धन्य ते पुढारी.. धन्य ते मद्य शौकीन..धन्य ते ढाबा चालक..!

Back to top button