पुणे : विक्रम गोखले यांच्या नावे अध्यासन : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन | पुढारी

पुणे : विक्रम गोखले यांच्या नावे अध्यासन : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ’सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विक्रम गोखले यांच्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टीने अध्यासन सुरू करून गोखले यांच्या अभिनयाच्या वारसाचे जतन केले जाईल,’ असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची कोथरूड शाखा आणि ’आम्ही कोथरूडकर’ यांच्या वतीने दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी पाटील बोलत होते.

विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यांच्यासह संदीप खर्डेकर, सुनील महाजन, अ‍ॅड. मंदार जोशी, त्यागराज खाडीलकर, किशोर सरपोतदार, राजेश दामले आदींनी गोखले यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. अध्यासनाव्यतिरिक्त गोखले यांच्या कुटुंबीयांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गोखले यांच्या गेल्या तीन पिढ्यांना मिळालेल्या पारितोषिकांचे दालन निर्माण करण्यासाठी आणि एकूणच त्याही प्रकल्पाला गती मिळण्यासाठी पाटील यांनी त्यांच्या निधीतून तातडीने एक कोटी रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली.
वृषाली गोखले म्हणाल्या, ’विक्रम गोखले नावाचा ऑरा ते कधी मिरवत नसत. घरीदेखील सर्वसामान्य व्यक्तीसारखाच त्यांचा सहज वावर असायचा. पिठलं-भाकरी आणि खर्डा त्यांना खूप आवडायचे. अभिनयरूपी विद्या इतरांना वाटत राहण्यावर त्यांचा प्रचंड भर होता.

Back to top button