इथेनॉल मुळे साखर उतार्‍यात घट | पुढारी

इथेनॉल मुळे साखर उतार्‍यात घट

कोल्हापूर : संतोष पाटील

राज्यात 190 साखर कारखान्यांनी उच्चांकी उसाचे गाळप केले असले तरी दहा वर्षांतील नीचांकी साखर उतारा मिळाला. उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती मोठ्या प्रमाणात झाल्याने अर्धा ते पाव टक्का उतार्‍यात फरक पडला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या तपासणी अहवालानंतर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील पाच कारखान्यांच्या एफआरपीत वाढ झाल्याने शेतकर्‍यांना सरासरी टनाला जादा पैसे मिळणार आहेत.

एक टक्का उतार्‍यात फरक पडल्यास शेतकर्‍यांना प्रतिटन 310 रुपये एफआरपी कमी मिळते. मागील दहा वर्षांत सरासरी 11.30 टक्क्यांपेक्षा अधिक असलेला साखर उतारा यावेळी 10.50 टक्क्यांवर आला. मोहोळ तालुक्यातील जाकराया शुगरचा उतारा सर्वात कमी 5.57 टक्के आहे. राज्यात सर्वात नीचांकी उतारा असलेल्या दहा कारखान्यांमध्ये सहा खासगी तसेच प्रामुख्याने इथेनॉल निर्मिती करणारे आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या फेरमूल्यांकन अहवालानुसार कोल्हापूर विभागातील सरसेनापती संताजी घोरपडे, तात्यासाहेब कोरे वारणा कारखाना, दालमिया शुगर्स, गुरुदत्त शुगर, सोनहिरा, दालमिया (करूंगळी), शाहू कारखाना (कागल) यांचा फेरतपासणी अहवाल आल्याने ते एफआरपीत वाढ करून देणार आहेत.

गाळप आणि इथेनॉलनिर्मिती क्षमतेत वाढ

190 साखर कारखान्यांच्या 7.28 लाख टन गाळप क्षमतेत 0.76 लाख टन वाढ होऊन 2021-2022 हंगामात 8.05 लाख टनांनी वाढ होईल. राज्यातील एकूण 117 कारखाने (यामध्ये 45 स्वतंत्रपणे इथेनॉलनिर्मिती करणार्‍यांसह) 2020-2021 मध्ये एक कोटी 64 लाख 11 हजार लिटर, तर 2021-2022 हंगामात 145 कारखाने दोन कोटी 20 लाख लिटर क्षमतेने इथेनॉलनिर्मिती करतील, असा साखर आयुक्तांचा अहवाल अंदाज दर्शवितो.

उसाचा रस, सिरप, बी हेवी मोलॅसिस वापरून इथेनॉलनिर्मिती केल्यामुळे सरासरी साखर उतारा काही प्रमाणात घटतो. या संबंधातील सर्व आकडेवारी, तांत्रिक अहवाल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडे पाठवून तपासणी अहवालानंतर साखर उतार्‍यामध्ये वाढ करूनच सरासरी साखर उतारा निश्चित केला जातो. त्यामुळे एफआरपी निश्चित करताना ऊस उत्पादकांना इथेनॉलनिर्मिती केल्यामुळे त्यांच्या ऊसदरावर काहीही परिणाम होत नाही.
– पी. जी. मेढे (साखर उद्योगाचे अभ्यासक)

Back to top button