समृद्धीच्या इंटरचेंजला शिर्डी-कोपरगाव नाव द्या : आ. आशुतोष काळे | पुढारी

समृद्धीच्या इंटरचेंजला शिर्डी-कोपरगाव नाव द्या : आ. आशुतोष काळे

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा :  समृद्धी महामार्गासाठी कोपरगाव तालुक्यातील असंख्य शेतकर्‍यांच्या जमिनी घेण्यात आल्या असून या समृद्धी महामार्गाचे कोपरगाव तालुक्यातील अंतर जवळपास 30 किलोमीटरचे आहे. त्यामुळे या शिर्डी इंटरचेंजला ‘शिर्डी-कोपरगाव इंटरचेंज’ असे नाव देण्यात यावे. तसेच या शिर्डी इंटरचेंज परिसरात होणार्‍या टोल प्लाझाला देखील शिर्डी बरोबरच कोपरगावचे देखील नाव जोडले जाऊ न ‘शिर्डी-कोपरगाव टोल प्लाझा’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील नागरिकांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी पर्यंतच्या पूर्ण झालेल्या कामाचे उद्घाटन (दि.11) रोजी होणार असल्याचे जवळपास निश्चित झालेले आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवार (दि.4) रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते कोपरगाव -शिर्डी पर्यतच्या पूर्ण झालेल्या कामाची शिर्डीपर्यंत पाहणी केली. त्यावेळी आ. काळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांना कोपरगाव तालुक्यातील जनतेच्या भावना निवेदनाच्या माध्यमातून सांगितल्या.

निवेदनात आ. यांनी असे म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्यातून जाणार्‍या बहुचर्चित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे नागपूर ते कोपरगाव-शिर्डी पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. कोपरगाव येथील इंटरचेंजला तीर्थक्षेत्र शिर्डी या पवित्र स्थळाचे ‘शिर्डी इंटरचेंज’ असे नाव देण्यात आले. ही तमाम साई भक्तांसाठी व कोपरगाव मतदार संघातील नागरिकांसाठी अभिमानास्पद बाब आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे ‘शिर्डी इंटरचेंज’ हे कोपरगाव तालुक्याच्या हद्दीत येत आहे. 30 किलोमीटरच्या या महामार्गासाठी कोपरगाव तालुक्यातील असंख्य शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी दिलेल्या आहेत. त्यामुळे मतदार संघातील जनतेची या महामार्गावरील शिर्डी इंटरचेंजला ‘शिर्डी-कोपरगाव’ इंटरचेंज असे संबोधण्यात यावे, अशी मनस्वी इच्छा व मागणी आहे.

तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील शिर्डी इंटरचेंज परिसरात होणार्‍या शिर्डी टोल प्लाझाला देखील शिर्डी बरोबरच कोपरगावचे देखील नाव जोडले जाऊन ‘शिर्डी-कोपरगाव टोल प्लाझा’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.

कोपरगाव तालुक्यातील नागरिकांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून केलेली मागणी पूर्ण करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. यावेळी व्हा. चेअरमन दिलीपराव बोरनारे आदी उपस्थित होते.

जमिनी देणार्‍या शेतकर्‍यांच्या अडचणी सोडवा

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे शिर्डी कोपरगावपर्यंत काम पूर्ण होऊन उद्घाटन देखील होणार आहे. मात्र कोपरगाव तालुक्यातील ज्या शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्या शेतकर्‍यांच्या व अनेक नागरिकांच्या अजूनही काही अडचणी सुटलेल्या नाहीत. त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू असून या अडचणी देखील सोडवाव्यात, अशी मागणी देखील आ. काळे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

Back to top button