पुणे : स्ट्रॉबेरीची लाली वाढली; हंगाम बहरल्याने आवकेत मोठी वाढ | पुढारी

पुणे : स्ट्रॉबेरीची लाली वाढली; हंगाम बहरल्याने आवकेत मोठी वाढ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रंगाने लाल चुटूक, चवीने आंबट-गोड असलेल्या स्ट्रॉबेरीचा हंगाम बहरल्याने बाजारात आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याला मागणीही चांगली असली, तरी आवक जास्त असल्याने दरात घसरण झाली आहे. घाऊक बाजारात पावणेदोन किलोच्या ट्रेला 150 ते 350 रुपये भाव मिळत आहे.

मार्केट यार्डातील फळबाजारात वाई, सातारा, भिलार, तसेच नाशिक जिल्ह्यातून एकूण मिळून पाच हजार प्लास्टिक ट्रेची आवक होत आहे. एका ट्रेमध्ये साधारणपणे आठ प्लास्टिकची छोटी खोकी (पनेट) असतात. एका पनेटमध्ये 250 ग्रॅम स्ट्रॉबेरीची फळे असतात. एका ट्रेमध्ये पावणेदोन किलो स्ट्रॉबेरीची फळे असतात. एका ट्रेची किंमत प्रतवारीनुसार 150 ते 350 रुपये दरम्यान आहे.

यंदा ऑक्टोबर महिन्यात पावसाच्या तडाख्यामुळे वाई, महाबळेश्वर, भिलार भागातील स्ट्रॉबेरीची नुकसान झाले. हंगामाच्या सुरुवातीला स्ट्रॉबेरीची आवक कमी प्रमाणावर झाली. त्यामुळे स्ट्रॉबेरीचे दर तेजीत होते. त्यानंतर गेल्या काही पंधरवड्यापासून फळबाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढली असून, दरात घट झाली आहे. स्ट्रॉबेरीला मागणीही चांगली असल्याचे मार्केट यार्डातील स्ट्रॉबेरी व्यापारी सुभाष राऊत यांनी सांगितले.

Back to top button