पिंपरी : कलागुण सादरीकरणासाठी सोशल मिडियाचा वापर | पुढारी

पिंपरी : कलागुण सादरीकरणासाठी सोशल मिडियाचा वापर

वर्षा कांबळे : 

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : आपल्या मुलांमधील कलागुण हे जगासमोर यावेत आणि त्याचे कौतुक व्हावे, अशी इच्छा प्रत्येक आई-वडिलांची असते. पण प्रत्येकाला कला सादर करायला व्यासपीठ मिळतेच असे नाही; मात्र सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडिया असे साधन आहे की, अगदी सोप्यारितीने हजारो किंवा लाखो लोक तुमची कला पाहू शकतात. त्यामुळे शालेय विद्यार्थीदेखील आता कला सादरीकरणासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत.

जगप्रसिद्ध पॉपगायक जस्टिन बीबर याच्या आईने सुरुवातीला त्याची कला जगासमोर यावी, म्हणून त्याच्या गाण्याचे व्हिडीओ यू ट्युबवर टाकले. यानंतर त्याची गाणी लोकांना आवडायला लागली आणि खूप कमी वेळात लहानवयातच तो मोठा स्टार बनला. एका गरीब कुटुंबातील मुलगा सोशल मीडियामुळे अशा पद्धतीने स्टार होतो. त्यामुळे प्रत्येक पालकांनाही आपल्या मुलाला स्टार होता आले नाही, तरी प्रसिद्धी मिळावी, या हेतूने त्यांच्यातील कला सोशल मीडियातून जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणामुळे सर्व शालेय मुलांच्या हातात मोबाईल आले. यामुळे अभ्यासाबरेाबरच मुलांची मोबाईलमधील अ‍ॅक्टिव्हिटी वाढली आहे. कलासादरीकरणासाठी आता शाळेच्या स्नेहसंमेलनाची वाढ पहात बसायची गरज पडत नाही.

स्टोरी टेलिंग अ‍ॅप :
ज्या मुलांमध्ये वक्तृत्व गुण आहेत किंवा बोलण्यासाठी सभाधीटपणा आहे. अशी मुले पालकांना सोबत घिऊन यू ट्युबवर स्टोरी टेलिंगसारखे अ‍ॅप चालविताना दिसतात. यामध्ये गोष्टीच्या पुस्तकातील एखादी कथा ही आपल्या खुमासदार शैलीत सांगण्याची आणि ती यु ट्युबवर अपलोड करायची. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्याची कला विकसित होत आहे.

स्पोकन इंग्लिश व्हिडीओ :
यामध्ये काही छोट्या छोट्या मराठी वाक्यांचे भाषांतर हे इंग्रजीमध्ये केले जाते. यामध्ये दोन व्यक्तींचा संवाद असतो. एक मराठीमधील वाक्य बोलते आणि दुसरी तिचे इंग्रजीमध्ये भाषांतर करते. असा एक दोन ते तीन मिनिटांचा व्हिडीओ तयार केला जातो.

नृत्य, गायनाचे व्हिडीओ

यामध्ये ज्या मुलांना नृत्याची आवड आहे ती मुले हिंदी, मराठी गाण्यांवर आधारित नृत्याचा तयार करून तो व्हिडीओ यू ट्युबवर अपलोड केला जातो. तसेच ज्यांना गाणे गाता येते ती मुले स्वत:च्या आवाजातील गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करतात.

 

माझ्या मुलाकडे उत्तम संभाषण कौशल्य आहे. तो स्टोरी टेलिंग अ‍ॅप चालवितो. त्याचे व्हिडीओ आम्ही सोशल मीडियावर अपलोड करतो. नागरिकांकडून खूप चांगला प्रतिसाद येतो. यामुळे मुलेदेखील कलेच्या प्रवाहात राहतात.
– अवनीश पवार (पालक)

Back to top button