सणसवाडी येथे ओढ्याची दुर्गंधी; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात | पुढारी

सणसवाडी येथे ओढ्याची दुर्गंधी; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

कोरेगाव भीमा; पुढारी वृत्तसेवा : सणसवाडी (ता. शिरूर) हे गाव औद्योगिक क्षेत्रात नावाजलेले असून, बहुतांश नागरिक मजुरीसाठी बाहेर गावातून मोठ्या प्रमाणात येथे वास्तव्यास आले आहेत. येथील लोकवस्तीत वाढ होत असताना विकासकामांसोबत ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेणे हा खूप महत्त्वाचा मुद्दा समजला जातो. मात्र येथील ओढ्याची प्रचंड दुर्गंधी परिसरात पसरली असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन मात्र काणाडोळा करीत आहे.

सणसवाडी येथील सणसवाडी ते तळेगाव रस्त्यालगत सराटेवस्तीजवळ एक ओढा आहे. अनेक महिन्यांपासून या ओढ्यातील घाण सांडपाणी खोल जागेत एकाच जागी साठले आहे. खोल जागा व त्यातच छोटी-मोठी झाडेझुडपे पडली असल्याने साठत असलेले पाणी पुढे न जाता एकाच ठिकाणी थांबून राहिले आहे. त्यामध्ये प्लास्टिक कचरा, झाडे, लाकडे अनेक दिवसांपासून या ठिकाणी सडत आहेत.

त्यामुळे दुर्गंधी, डास, दूषित हवा अशा अनेक समस्यांचा सामना येथील रहिवासी ग्रामस्थ व व्यावसायिकांना करावा लागत आहे.
ग्रामस्थांनी अनेक वेळा याबाबत सणसवाडी ग्रामपंचायतीस अर्ज केले. परंतु आजपर्यंत या समस्येवर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. लवकरात लवकर या समस्येपासून मुक्त करावे, अशी मागणी ग्रामपंचायतीस वारंवार केली जात आहे.

मागील अनेक वर्षांपासून सणसवाडी ग्रामपंचायतीकडे या समस्येबाबत आम्ही पाठपुरावा करीत आहोत. मात्र त्यांच्याकडून टाळाटाळ होत आहेत. लवकरात लवकर या ओढ्याची समस्या सोडवली नाही तर आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल करणार आहोत.
                                                     – अर्जुन सैद, माजी अध्यक्ष,
                                            अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरूर तालुका

Back to top button